27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeसोलापूरवाघाला पकडण्यासाठी तज्ज्ञांची रॅपिड रिस्पॉन्स टीम दाखल

वाघाला पकडण्यासाठी तज्ज्ञांची रॅपिड रिस्पॉन्स टीम दाखल

सोलापूर : बालाघाट परिसरात वावरणाऱ्या वाघाने काही दिवसांतच सोलापूर जिल्ह्यात दहशत निर्माण केली आहे. त्याने आतापर्यंत अनेक पाळीव जनावरांवर हल्ला केला आहे. तो सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असल्याने संपूर्ण जिल्ह्यात घबराटीचे वातावरण आहे.

या पार्श्वभूमीवर वन विभागाने या वाघाला पकडण्याचे आदेश काढले असून याची जबाबदारी आतापर्यंत ६० पेक्षा अधिक वाघ पकडणाऱ्या पथकावर सोपविली आहे.

सोलापूरात १६ डिसेंबरला चारे गावात वाघ आढळल्यानंतर त्याचा मुक्काम अद्यापही बार्शी व वैराग परिसरातच असल्याचे दिसत आहे. जवळपास महिनाभरापासून या वाघाने चारे, उक्कडगाव, चारे, ढेंबरेवाडी, पांढरी, मुंगशी (आर.) राळेरास, वैराग भागातील लाडोळे हद्दीत पाळीव जनावरांवर हल्ले करून दहशत निर्माण केल्यानंतर वाघाचा सध्या जामगाव (पा.) हद्दीत वावर आहे. बार्शी, वैराग, राळेरास भागांसह जिल्हाभर भीतीचे वातावरण आहे. बार्शी तालुक्यातील ढेंबरेवाडी येथील कॅमेऱ्यात हा वाघ कैद झाला होता.

आतापर्यंत वाघाने ज्या ज्या ठिकाणी प्रवास केला, तेथील पाळीव जनावरांवर हल्ले केले आहेत. या पार्श्‍वभूमीवर स्थानिक नागरिक व लोकप्रतिनीधींनी वाघाला पकडण्याची मागणी जिल्हा प्रशासन व वनविभागाकडे केली होती. यासंदर्भात अखेर वनविभागाने या वाघाला पकडण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिक वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन वाघाला पकडण्याची कार्यवाही हाती घेतली जाणार आहे.

आतापर्यंत वाघाने आठ गावांमधील एकूण १३ जनावरांवर हल्ला केला आहे. १९ डिसेंबर ते ९ जानेवारी या दरम्यान वाघाने केलेल्या हल्ल्यात गाय, कालवड, बोकड, म्हैस, वासरू, रेडकू व बैल असे पाळीव प्राणी आहेत.
ताडोबा अभयारण्यातील तज्ज्ञांचे पथक सोलापूरातील वाघाला पकडण्यासाठी येणार आहे. पथकात एकूण १० जणांचा समावेश आहे. यामध्ये डॉक्टर, गनमॅन (शूटर) यांच्यासह कॅमेरामन व काळजीवाहू तज्ज्ञांचा समावेश आहे. आतापर्यंत या पथकाने ६० वाघांना सुरक्षितपणे पकडण्याची कामगिरी केली आहे. यामध्ये सर्वात जास्त वाघ चंद्रपूर जिल्ह्यात पकडले आहेत.

वाघाला पकडण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यासाठी ताडोबा अभयारण्यातील १० तज्ज्ञांची रॅपिड रिस्पॉन्स टीम सोलापूरात दाखल होईल. स्थानिक वन विभागाच्या साहाय्याने या वाघाला पकडण्याची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू होईल. वाघाला पकडल्यानंतर त्याला सह्याद्री व्याघ्र अभयारण्यात सोडण्यात येईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR