ताडकळस : पुर्णा तालुक्यातील ताडकळस व परिसरात काल मंगळवारी सायंकाळच्या सुमारास वातावरणातील बदलामुळे काही ठिकाणी वादळी वा-यासह विजेच्या कडकडाटात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे अनेक शेतक-यांची हळद भिजली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले असून जोरदार वा-यामुळे आंब्याची झाडे मुळासकट उन्मळून पडल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे.
ताडकळस व परिसरातील शिवारात मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास जोरदार मेघ गर्जनेसह पाऊस सुरू झाला. ज्या शेतक-यांनी उन्हाळा असल्याने हळद शिजवून शेतात टाकली होती ती अचानक आलेल्या पावसामुळे भिजली. त्यामुळे उत्पादनात कमालीची घट येणार आहे. तसेच या हळदीला योग्य भाव लागत नाही. परीणामी उत्पादन शेतक-यांचे मोठे नुकसान होणार आहे.
या पावसामुळे शेतात रहाणारे मेंढपाळ, आखाड्यावरील शेळ्या, गुरे, ढोरे सांभाळनारे शेतकरी अडचणी आले. उघड्यावर जनावराचा चारा भिजला आहे. आंबा पिकाचे खुप मोठे नुकसान झाले आहे. आंबा पिक विविध रोगामुळे फुलो-यात गळून गेले होते. आता राहीलेला आंबा वादळी वा-याने गळून पडला आहे. त्यामुळे यावर्षी रसाचा गोडवा कमी होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे अवेळी पडलेला पाऊस शेतकरी बांधवासाठी कर्दनकाळच ठरला असल्याचे शेतकरीवर्गातून बोलले जात आहे.