मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार
मुंबई : प्रतिनिधी
खरे तर लोक पूर्वी लॉर्डस ही क्रिकेटची पंढरी आहे, असे म्हणायचे. परंतु खरी क्रिकेटची पंढरी वानखेडे स्टेडियम आहे. पंढरी तिथे देव आणि क्रिकेटचा देव म्हणजे सचिन तेंडुलकर, त्याचा पुतळा या वानखेडे स्टेडियमवर आहे. त्यामुळे ही जी क्रिकेटची पंढरी आहे, तिथे हा सोहळा होत आहे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वानखेडे स्टेडियमबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
वानखेडे स्टेडियमवर तीन स्टँडचा नामकरण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी रोहित शर्मा स्टँड, अजित वाडेकर स्टँड आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष शरद पवार यांचे नाव स्टँडला देण्यात आले. यावेळी मुंबई इंडियन्सचे खेळाडू, माजी टीम इंडियाचा कर्णधार रवि शास्त्री आणि दिलीप वेंगसरकर यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईत आणखी एक स्टेडियम उभे केले पाहिजे, अशी इच्छा एमसीएकडे व्यक्त केली. त्यासाठी लागणारी सर्व मदत सरकारकडून केली जाईल, अशी ग्वाहीही दिली. वानखेडे स्टेडियम ५० वर्षे आपण सेलिब्रेट केले आणि पुढील ५० वर्षे हे आयकॉनिक स्टेडियम राहील. पण १ लाख लोक बसू शकतील, असे स्टेडियम आपण बनवले पाहिजे, त्यासाठी सरकार मदत करेल, असे ते म्हणाले.
शरद पवार, रोहित
शर्माबद्दल गौरवोद्गार
भारतीय क्रिकेटमध्ये आणि क्रिकेटच्या विकासासाठी शरद पवार यांनी केलेले काम नक्कीच मोठे आहे. आज भारतीय क्रिकेट ज्या स्तरावर आहे, त्याचे श्रेय पवार साहेबांचे आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचा गौरव केला. तसेच रोहित शर्माचे नाव खेळत असताना स्टँडला मिळाले, ही अभिमानाची बाब आहे. यासाठी रोहित ख-या अर्थाने पात्र आहे. चांगले खेळाडू रिटायर व्हावे, असे आपल्याला कधी वाटतच नाही. तो अधिक चांगला खेळेल याचा मला विश्वास आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांनी अजित वाडेकरांच्या योगदानाचाही उल्लेख केला.