अहमदाबाद : वृत्तसंस्था
तीव्र हवामान आणि व्यापक प्रमाणात करण्यात आलेल्या शहरीकरणामुळे गुजरातमध्ये पूरस्थिती निर्माण झाली, असा दावा भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) गांधीनगरमधील अभ्यासकांनी केला आहे.
गुजरातमध्ये २० ते २९ ऑगस्ट दरम्यान मुसळधार पाऊस झाला. राज्यातील एकूण ३३ जिल्ह्यांपैकी १५ जिल्ह्यांत या कालावधीत मागील १० वर्षांतील सरासरी पावसापेक्षा अवघ्या तीन दिवसांत अधिक पाऊस झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.
मागील आठवड्यात बडोद्यामध्ये अतिवृष्टी नसूनही पूरस्थिती निर्माण झाली होती. पूरप्रवण क्षेत्रात होत असणारी विकासकामे आणि सांडपाण्याबाबत नियोजनात केलेल्या तडजोडीमुळे ही परिस्थिती उद्भवली असे अभ्यासकांचे मत आहे.
गुजरातमधील मोर्बी, देवभूमी द्वारका आणि राजकोट येथे अशा पद्धतीने कमी दिवसांत अधिक पाऊस पडण्याचे प्रमाण मागील ५० वर्षांत वाढत आहे, असेही अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.