मुंबई : विशेष प्रतिनिधी
राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत ज्या इच्छुकांना तिकीट मिळाले नाही, त्यांनी अपक्ष आमदार म्हणून अर्ज भरला. यंदाही अपक्ष उमेदावारांची संख्या मोठी असणार आहे. राज्यात आतापर्यंत १९६२ पासून विधानसभेच्या १३ निवडणुका झाल्या. त्यात २४५ अपक्ष आमदार निवडून आले आहेत. सर्वाधिक अपक्ष आमदार १९९५ मध्ये निवडून आले. ती संख्या ४५ होती. त्यावेळी युतीच्या सत्ता स्थापनेत या आमदारांची भूमिका महत्वाची ठरली. तेव्हा अपक्ष आमदारांचे नेते हर्षवर्धन पाटील होते.
अपक्ष राजकीय पक्षांमध्ये दाखल
२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत १४०० आमदार निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यातील केवळ १३ जणांना विजय मिळवता आला. राज्यातील अपक्ष आमदारांची राजकीय ताकद ओळखून इतर पक्षांनी त्यांना आपल्या पक्षात संधी दिली. १९९५ मध्ये अपक्ष आमदारांचे नेते असलेले हर्षवर्धन पाटील कधीकाळी भाजपमध्ये होते. परंतु यंदा ते शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युतीच्या सरकार स्थापनेत त्यांची भूमिका महत्वाची होती. त्यांच्या नेतृत्वाखाली अपक्ष आमदार एकत्र आले होते. त्यातील काही जणांना मंत्रिपदही मिळाले.
अपक्ष उमेदवारांची कामगिरी…
२०१४ मध्ये विधानसभेत सर्वात कमी अपक्ष आमदार निवडून आले. त्यावेळी केवळ ७ अपक्ष उमेदवार आमदार होऊ शकले. त्यावर्षी जवळपास १७०० अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात होते. राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आलेले अपक्ष आमदार चंद्रपूरमधील आहेत. किशोर जोरगेवार हे २०१९ मध्ये ७२ हजार ६११ मतांनी निवडून आले होते. तसेच सर्वात कमी मतांनी निवडून आलेले आमदार दिग्रसचे संजय देशमुख आहेत. ते केवळ १२६ मतांनी १९९९ मध्ये निवडून आले होते.
वर्ष आमदारांची संख्या
१९६२ १५
१९६७ १६
१९७२ २३
१९७८ २८
१९८० १०
१९८५ २०
१९९० १३
१९९५ ४५
१९९९ १२
२००४ १९
२००९ २४
२०१४ ०७
२०१९ १३