26.2 C
Latur
Friday, December 6, 2024
Homeमहाराष्ट्रविरोधकांचा मुंबई तोडण्याचा डाव

विरोधकांचा मुंबई तोडण्याचा डाव

मविआच्या शेवटच्या सभेतून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल!

मुंबई : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्ष (बीजेपी) आणि विरोधकांना मुंबई तोडायची आहे. मुंबई आणि महाराष्ट्र गिळण्याचा या गुजरातींचा डाव आहे, असा घणाघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते मुंबई येथील बांद्रा-कुर्ला कॉम्पेल्स येथे झालेल्या मविआच्या शेवटच्या संयुक्त सभेत विरोधकांचा खरपूस समाचार घेताना बोलत होते.

यावेळी त्यांनी संपूर्ण मुंबई बिल्डरच्या घशात घातली जात आहे. याशिवाय धारावीच नाही तर आख्खी मुंबई अदानींच्या घशात घातली जात आहे. अदानींची सुलतानी हे नवे संकट तयार झाले आहे. अगदी कोल्हापूरच्या राधानगरीचे पाणी, चंद्रपूरमधील शाळा, एअरपोर्ट अगदी टोलनाके सुद्धा अदानीला दिले जात आहे. हे सरकार हे सगळे आदेश काढत आहे. वीज सुद्धा अदानीकडून विकत घ्यावी लागत आहे, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला आहे.

याशिवाय परराज्यातून माणसे आणून आपल्यावर नजर ठेवली जात आहे. हे मी नाही तर त्यांच्याच नेत्या पंकजा मुंडे बोलत आहेत. महाराष्ट्रातील ९० हजार बुथवर भाजपने पथके नेमली आहेत. त्यात सगळी परराज्यातील विशेषत: गुजरातमधील आहेत. यापूर्वी अशी कोणत्याही निवडणुकीत माणसे आणून नजर ठेवली जात नव्हती. असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे.

याबाबत बोलताना उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे जाहीर आभार देखील मानले आहेत. तू महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढली, अशा शब्दांत त्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. मविआच्या मुंबईतील सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना धन्यवाद देत म्हटले आहे की, पंकजाला मी खास धन्यवाद देतो की तिने महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढली आहे. मा. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली अन् स्वत:च्या डोळ्यांवर बांधली पण तिने तसे केले नाही. महाराष्ट्र आणि मुंबई बळकावण्याचा विरोधकांचा डाव आहे, असेही ते यावेळी म्हणाले आहेत.

… तर मोदींनी राजीनामा द्यावा
पंतप्रधान मोदी ‘एक है तो सेफ है’ ची घोषणा देतात, पण ‘मोदी है तो भ्रष्टाचारी, गद्दार, अत्याचारी सेफ है’ असेच म्हणावे लागेल. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा राज्यात सगळे सेफ होते, आणि मोदी पंतप्रधान असून, देखील कोणी सेफ नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि काम कसे करावे हे शिवसेनेकडून शिकून घ्यावे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR