मुखेड : प्रतिनिधी
तालुक्यातील होंडाळा येथे थकित वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरण कंपनीच्या लाईनमन आणि वीजपुरवठा खंडित केल्याने कनिष्ठ अभियंत्याला दगडाने मारहाण केल्याची घटना घडली. होंडाळा येथे घडलेल्या याप्रकरणी मुखेड पोलिसात चौघाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तालुक्यातील जांब बु गटाचे महावितरणचे कनिष्ठ अभियंता माधव ढगे, वरिष्ठ तंत्रज्ञ श्रीनिवास बाचे, संतोष पाटील, विजयकांत तेलंग हे होंडाळा येथे थकीत वीज बिल वसुलीसाठी दि. ९ रोजी गेले होते. यावेळी ग्राहक अशोक सूर्यवंशी यांना थकीत वीजबिल भरण्यास सांगितले असता त्यांनी वीजबिल भरण्यास नकार दिल्याने कर्मचा-यांनी त्यांचा वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर अशोक सूर्यवंशी व त्यांची पत्नी रेणुकाबाई यांनी कर्मचा-यांना शिवीगाळ केली आणि लाइनमन श्रीनिवास बाचे यांना दगडाने मारहाण केली.
या प्रकरणी लाईनमन श्रीनिवास बाचे यांच्या तक्रारीवरून आरोपी अशोक विठ्ठल सूर्यवंशी, रेणुकाबाई अशोक सूर्यवंशी, भागवत अशोक सूर्यवंशी व वंदनाबाई भागवत सूर्यवंशी यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, लोकसेवकाला दुखापत करणे या अनुषंगाने कलम ३५३,३३२,३४१,५०४,५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण हे करत आहेत. लाईनमनसह कनिष्ठ अभियंत्याला मारहाण केल्याने कार्यकारी अभियंता चटलावर, उप कार्यकारी अभियंता हैदर पटवेकर, सहाय्यक अभियंता दिलीप राठोड, क्रांतिकारी लाईन स्टॉप सेनेचे कपिल वाघमारे, शिवाजी कंदूरके, भास्कर जाधव, शिवाजी चव्हाण, अरुण गायकवाड, सुरेश यनावर उमाकांत भडरवार यांच्यासह महावितरणचे कर्मचारी फिर्याद नोंदविताना पोलीस स्टेशनला उपस्थित होते.
कर्मचारी संघटनेकडून निषेध
दरम्यान वीज कर्मचारी मारहाण प्रकरणी घटनेचा वर्कर्स फेडरेशनकडून नांदेड येथे निषेध करण्यात आला आहे. या आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, कर्मचा-यांना मारहाण करणा-या ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी बंद करावा, कर्मचा-यांना वसुली करताना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी झोन सचिव संजय टाक, सहसचिव सुरेश गुंडमवार, कामगार नेते विजय रणखांब, मंडळ अध्यक्ष मोईनभाई, सचिव बालाजी सकरगे, तांत्रिक सदस्य भीमराव खानसोळे, व्ही.जी परळकर व अन्य संघटनेचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.