निलंगा : प्रतिनिधी
तालुक्यातील अनेक गावात शनिवार दि. २० एप्रिल रोजी दुपारी वादळी वा-यासह वीजेच्या कडकडाटात जोरदार झालेल्या अवकाळी गाराच्या पावसाने शेतक-यांच्या अंबा व फळबागांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले तर वीज पडून तीन गावात चार जनावरे दगावले असल्याचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.
निलंगा तालुक्यातील हासोरी, कासार शिरशी, ऊस्तूरी, कलमुगळी, टाकळी आदीसह अनेक गावाला आज वादळी वा-यासह विजेच्या कडकडाटात गाराच्या अवकाळी पावसाने झोडपले. यात तीन गावातील चार शेतक-यांची चार जनावरे वीज पडून दगावली आहेत. यात कलमूगळी येथे वीज पडून ज्ञानेश्वर शिवाजी वाघमारे यांची म्हैस, गहीनाथ व्यंकट गोबडे यांच्या म्हशीचे लहान वासरू, टाकळी येथील श्रीरंग गोविंद नरहारे यांची म्हैस व गणपती काशिनाथ बिरादार यांची म्हैस अशी वीज पडून तीन गावात चार जनावरे दगावले असल्याचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.
वीजेच्या कडकडाटात वादळी वा-यासह जोरदार झालेल्या गारांच्या पावसाने शेतक-यांच्या अंबा व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वादळी वा-याने झाडे उन्मळून पडली आहेत. वादळी वा-यासह वीजेच्या कडकडाटासह जोरदार झालेल्या गारांच्या पावसाने शेतक-यांच्या झालेल्या पीकांचे व फळबागांचे प्रशासनाकडून तात्काळ पंचनामे करण्यात यावे अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.