पुणे : प्रतिनिधी
वैष्णवी हगवणे प्रकरणात शुक्रवारी पोलिसांनी निलेश चव्हाण याला नेपाळ सीमेवरून अटक केली. त्याला आज पुणे सत्र न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता, न्यायालयाने त्याला तीन जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, सध्या राज्यभर गाजत असलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणात बंदुकीच्या धाकावर वैष्णवीचे दहा महिन्यांचे बाळ स्वत:कडे निलेश चव्हाण याने ठेवले होते. यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. निलेश चव्हाण हा मागील दहा ते बारा दिवसांपासून फरार होता. विदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना पुणे पोलिसांनी त्याला नेपाळ बॉर्डरवरून शुक्रवारी अटक केली आहे.
वैष्णवी हगवणे कथित आत्महत्या प्रकरणात निलेश चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश चव्हाण याने वैशाली हगवणे यांचे बाळ बंदुकीच्या धाकावर ताब्यात ठेवून त्याची हेळसांड केली, असा त्याच्यावर आरोप आहे. त्यामुळे पोलिस निलेश चव्हाण याचा शोध घेत होते. मात्र तो विदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला नेपाळ बॉर्डरवरून अटक केली. आज त्याला पुणे पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.
चव्हाणने केला मोबाईलमधील डाटा डिलीट
आज निलेश चव्हाण याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयात सरकारी वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. सरकारी वकील म्हणाले की, निलेशचा मोबाईल जप्त करायचा आहे. निलेशवर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाण याचा काय सहभाग आहे, हे देखील तपासायचं आहे. निलेश चव्हाणने वैशाली हगवणे यांना त्रास दिला असून त्याच्याकडचे दोन मोबाईल जप्त करायचे आहेत. निलेशने मोबाईल डाटा देखील डिलीट केला आहे, तो रिकव्हर करायचा आहे. त्यामुळे निलेश चव्हाण याला पोलिस कोठडी देण्यात यावी.
केवळ बाळ होते म्हणून निलेश चव्हाणचे नाव : सरकारी वकिलांनी युक्तिवाद केल्यानंतर आरोपीच्या वकिलांनी त्यावर आक्षेप घेतला. आरोपीच्या वकिलांनी युक्तिवादात म्हटले, की केवळ बाळ त्यांच्याकडे होते म्हणून या प्रकरणात निलेश चव्हाण याचे नाव घेण्यात आले आहे. त्यानंतर त्याच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याच्याकडे शस्त्राचा परवाना आहे, पण त्याने शस्त्र कुठेच वापरले नाही. हा गुन्हा का दाखल करण्यात आला आहे, असा सवाल आरोपीच्या वकिलांनी केला.