मुंबई : वृत्तसंस्था
वैद्यकीय क्षेत्रातल्या नोबेलची घोषणा करण्यात आली असून व्हिक्टर अॅम्ब्रोस आणि गॅरी रुवकून यांना या प्रतिष्ठीत पुरस्काराने १० डिसेंबर रोजी गौरविण्यात येणार आहे. ‘मायक्रो आएनए’ आणि त्याचे कार्य यावरील शोधामुळे त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात येत आहे. शरीरातील अवयवांचा विकास आणि त्याचे कार्य यासाठी हा शोध महत्त्वाचा आहे असं नोबेल कमिटीने म्हटलं आहे. नोबेल पारितोषिकाची सुरुवात १९०१ मध्ये झाली असून २०२४ पर्यंत वैद्यकीय क्षेत्रातील २२९ जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यंदाचा मेडिसीन मधील नोबेल १० डिसेंबर रोजी देण्यात येणार आहे.
या वर्षी ७ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीत विज्ञान, अर्थशास्त्र, साहित्य आणि शांतता यांसारख्या क्षेत्रात उत्तम कार्य करणा-या लोकांना नोबेल पारितोषिक प्रदान केले जाणार आहे. हे पुरस्कार स्टॉकहोम, स्वीडन येथे दिले जात आहेत. दरवर्षी ११ दशलक्ष स्वीडिश क्रोनर म्हणजेच अंदाजे ८.९० कोटी रुपयांचे नोबेल पारितोषिक देण्यात येतात.