27.7 C
Latur
Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवारांच्या भेटीसाठी मोदी बागेत गर्दी

शरद पवारांच्या भेटीसाठी मोदी बागेत गर्दी

पुणे : राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत असून शरद पवार यांनी राजकीय डावपेच टाकायला सुरुवात केली आहे. लोकसभेतील मोठ्या विजयानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरू असून महायुतीमधील अनेक बडे नेते तुतारी हाती घेण्यास इच्छुक आहेत. एकीकडे शरद पवार स्वत: महाराष्ट्रभर दौरे करत महायुतीला धक्के देत आहेत. दुसरीकडे पुण्यामध्ये शरद पवार यांच्या भेटीसाठी अनेक बडे नेते येत असून उमेदवारीसाठी जोरदार शक्तिप्रदर्शन केले जात आहे. त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्रे पुण्यातून हालत असल्याची चित्रे दिसत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यामध्ये शरद पवार यांची अनेक नेत्यांनी भेट घेतल्याने महायुतीसह इच्छुकांचीही धाकधूक वाढली आहे.

विधानसभेच्या मोर्चेबांधणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने कंबर कसली आहे. एकीकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांनी शिवस्वराज्य यात्रा काढली असताना स्वत: शरद पवारही मैदानात उतरले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून शरद पवार, पुणे, बारामतीच्या दौ-यावर असून त्यांचे निवासस्थान असलेल्या गोविंद बाग येथे अनेक बडे नेते शरद पवारांच्या भेटीला येत आहेत.

माण-खटावमध्ये अनिल देसाई इच्छुक..
आज सकाळीच माण-खटावमधील नेते, सातारा जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई यांनी आपल्या समर्थकांसह मोठे शक्तिप्रदर्शन करत शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी माण-खटावमध्ये विधानसभेची उमेदवारी मिळावी, याबाबत चर्चाच झाल्याचे अनिल देसाई यांनी सांगितले. माण आणि खटाव मतदारसंघातील कार्यकर्ते घेऊन आलो आहे. मी उमेदवारीची मागणी केली आहे, १५ वर्षे थांबलो आहे, माणच्या उर्मट आमदारांना धडा शिकवायचा आहे. त्यामुळे मला उमेदवारी पाहिजे, असे अनिल देसाई म्हणाले.

उमेदवारीवरून ‘मविआ’मध्ये सामना..?
माण-खटाव तालुक्यामध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून प्रभाकर देशमुख यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे, दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून शेखर गोरेही इच्छुक आहेत. अशातच आता अनिल देसाई यांनीही या मतदारसंघावर दावा केल्याने महाविकास आघाडीमध्येच उमेदवारीवरून रणकंदन होण्याची शक्यता आहे.
पंढरपूरमधील बड्या नेत्यांची भेट..

दुसरीकडे काल पंढरपूरचे नगराध्यक्ष नागेश भोसले, आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत, काँग्रेसचे आदित्य फत्तेपूरकर, माजी सभापती वसंत देशमुख, भगीरथ भालके यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिका-यांनी शरद पवारांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली आहे. त्यानंतर आज एकेकाळचे शरद पवारांचे निष्ठावंत औदुंबर अण्णा पाटील यांचे नातू अमरजीत पाटील यांनी शरद पवारांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामुळे पंढरपुरात उमेदवारीचा गुंता वाढला आहे.

फलटणमधील बौद्ध समाजाचे कार्यकर्ते भेटीला
दरम्यान, फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून बौद्ध समाजाला उमेदवारी मिळावी या मागणीसाठी फलटणमधील बौद्ध समाजाचे कार्यकर्ते शरद पवार यांच्या भेटीला आले होते. शरद पवारांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. आम्ही सगळ्या पक्षांना उमेदवारी मागतो आहोत. आता शरद पवार आम्हाला न्याय देतील असे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR