मुंबई : प्रतिनिधी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगड दौ-यावर असताना जेवण्यासाठी खासदार सुनिल तटकरे यांच्याकडे गेले होते. त्यासाठी उभारलेल्या हेलिपॅडचा खर्च १ कोटी ३९ लाख रुपये होता. त्यावरून, एका जेवणाचा खर्च एवढा करण्याची गरज काय, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी किल्ले रायगडावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले होते. किल्ले रायगडावर १२ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर खासदार सुनील तटकरे यांच्या आमंत्रणानुसार अमित शहा सुतारवाडीमध्ये तटकरे यांच्या निवासस्थानी जेवायला गेले होते.
त्यामुळे खास अमित शहांना तेथे हेलिकॉप्टरने जाता यावे म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याने १ कोटी ३९ लाख रुपये खर्चून हेलिपॅड उभारले होते. त्यासाठी ९ एप्रिल रोजी निविदा काढली होती. या हेलिपॅडवरून जितेंद्र आव्हाड यांनी अमित शहा यांना लक्ष्य केले आहे. या जेवणाचा खर्च भाववाढ करून सामान्यांच्या खिशातून हे सरकार वसूल करेल, अशी टीका त्यांनी केली आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, वाड्या वस्त्यांवर रस्ते नसल्याने उपचाराअभावी लोक जीव गमावत आहेत. तर देशाच्या गृहमंत्र्यांना एका वेळच्या जेवणासाठी यजमानाकडे जाण्यासाठी १ कोटी ३९ लाख रुपये खर्च केले जातात. त्यांना एवढीच भूक लागली होती तर मीच रायगडावर पेणवरून जेवण घेऊन गेलो असतो. त्यामुळे इतका खर्च वाचला असता, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.