14.7 C
Latur
Wednesday, January 8, 2025
Homeमहाराष्ट्रशासकीय कर्मचा-यांचे पगार होणार भाजप आमदाराच्या बँकेतून?

शासकीय कर्मचा-यांचे पगार होणार भाजप आमदाराच्या बँकेतून?

मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत झाला निर्णय

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची नव्या वर्षातील पहिलीच बैठक झाली. आज (ता. २) १२ वाजता झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये शासकीय कर्मचा-यांचे वेतन आणि भत्ते याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. शासकीय कर्मचा-यांचे वेतन मुंबै बँकेत होणार आहे . भाजपचे आमदार प्रवीण दरेकर मुंबै बँकेचे अध्यक्ष आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

आज घेण्यात आलेल्या बैठकीत वादाचे कारण ठरलेले आणि इतरांना सहाव्या मजल्यावर प्रवेश द्यायचा की नाही यावर चर्चा झाली. पण मंत्री दत्तात्रय भरणेंनी बैठकीला दांडी मारण्याने राजकीय चर्चांना ऊत आला आहे. तर ते खात्यावरून नाराज असल्याचेही बोलले जात आहे.
दरम्यान मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमध्ये असंतोष पसरला असून मंत्री धनंजय मुंडेही या बैठकीला उपस्थित होते. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तर या प्रकरणात आपला कोणताही संबंध नसल्याने राजीनामा देण्याचा काहीच संबंध येत नाही, असे स्पष्टीकरण मुंडे यांनी दिले आहे.

बैठकीत घेण्यात आलेले निर्णय :
१) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम-२२० मध्ये आकारी पड जमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णय (महसूल विभाग)

२) शासकीय कर्मचा-यांचे वेतन आणि भत्ते प्रदान आता मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत जमा होणार. यासाठी वैयक्तिक खाते उघडण्यास तसेच महामंडळ, सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीस प्राधिकृत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

मुंबै जिल्हा बँकेतून होणार पगार
शासकीय नोकरदारांचे वेतन मुंबै बँकेतून केले जाणार आहे. यासाठी कर्मचा-यांची खाती मुंबै बँकेत उघडली जाणार आहेत. मुंबै बँक भाजपच्या ताब्यात असून भाजपचे आमदार प्रवीण दरेकर याचे अध्यक्ष आहेत. तर दरेकर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात.

शेतक-यांसाठी मोठा निर्णय
राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये शेतक-यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकार ४ हजार ८४९ एकर जमिनी शेतक-यांना परत करणार आहे, याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील ९६३ शेतक-यांना फायदा होणार आहे. या वर प्रतिक्रिया देताना बैठकीत शेतक-यांना दिलासा देणारा निर्णय घेतल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. याशिवाय महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम-२२० मध्ये आकारी पड जमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा देखील निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

अजित पवार गैरहजर
एकीकडे बीडसह राज्यातील जनता आणि काँग्रेसचे नेते संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून संताप व्यक्त करत आहेत. ते मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे मात्र यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. ते आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील गैरहजर होते. यावरून देखील आता चर्चांना ऊत आला आहे. अशातच ते विदेशात गेल्याने बैठकीला आले नसल्याचे आता कारण समोर आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR