मुंबई : प्रतिनिधी
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेना पक्षाशी युती झाली आहे. ‘ही युती आताची नाही. तर, ही युती प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आहे,’ असे रिपब्लिकन सेना पक्षाचे नेते, आनंदराज आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तर, ‘एक बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा तर दुसरी बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताचा वारसा घेऊन पुढे जाणारी सेना आहे,’ असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आनंदराज आंबेडकर म्हणाले, ही युती आताची नाही. तर, ही युती प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आहे. राजकीय आणि सामाजिक परिवर्तन करण्यासाठी दोन्ही कार्यकर्ते एकत्र आले आहे. एकनाथ शिंदे हे कार्यकर्ते आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ते सगळ्यांच्या सुख दु:खाशी एकरूप होण्याचा निर्णय घेतला. आंबेडकरी समाज हा अनेक वर्षांपासून रस्त्यावरील लढाई लढत आला. पण, कार्यकर्त्याला काही मिळाले नाही. या कार्यकर्त्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सत्तेचा लाभ व्हावा म्हणून आम्ही दोघांनी एकत्र येण्याचे ठरवले आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले, शिवसेना आणि रिपब्लिकन दोन्ही सेना आहेत. रस्त्यावर अन्यायाविरुद्ध लढणा-या सेना आहेत. एक बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा तर दुसरी बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताचा वारसा घेऊन जाणारी सेना आहे. त्यामुळे आमचं एकदम चांगले जमणार आहे. मी मुख्यमंत्री असताना कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. मी सीए म्हणजे कॉमन मॅन म्हमून काम केले आहे. आता मी डिसीएम आहे, म्हणजे ‘डेडिकेटेड कॉमन मॅन’ सर्वसामान्य माणूस आणि कार्यकर्ता हीच आपली सामाजिक बांधिकली आहे.