मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी पवार गटाचे नेते शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यावरून ठाकरे गटात तीव्र पडसाद उमटले होते. हा वाद सुरू असतानाच आणखी एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. या सत्कार सोहळ्यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय दीना पाटील त्याठिकाणी उपस्थित होते.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीतील सत्कार सोहळ्यावरून सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वादंग रंगला आहे. ईशान्य मुंबईचे ठाकरे गटाचे खासदार संजय दीना पाटील या सोहळ्याला उपस्थित होते. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा ३६चा आकडा असूनही संजय दीना पाटील या सोहळ्याला कसे उपस्थित राहिले, असा सवाल आता विचारला जात आहे. संजय दीना पाटील यांनी सोशल मीडियावर या सोहळ्याचे फोटो शेअर केल्यानंतर ही बाब समोर आली.
सोहळ्याचे निमंत्रण आले होते : संजय दीना पाटील
दरम्यान, संजय दीना पाटील यांनी आपल्याला या सोहळ्याचे निमंत्रण असल्यामुळे आपण तिकडे गेलो होतो, अशी प्रतिक्रिया दिली आहे. संजय दीना पाटील हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे त्यांची शरद पवार यांच्याशी जवळीक आहे. त्यामुळेच ते या कार्यक्रमाला गेले असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे.