शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
सतत अवर्षणाचा सामना करणा-या शेतक-यांना शाश्वत पाणीस्त्रोत उपलब्ध झाल्याने पारंपरिक पिकांसह शेतक-यांंनी आता बागायती पिकांवर भर दिला आहे. शाश्वत पाण्यामुळे शिरूर अनंतपाळ तालुक्यात शेतकरी ऊसाला पसंती देत आहेत. शिरूर अनंतपाळ तालुक्यात २ हजार १०० हेक्टर ऊसाचे क्षेत्र असून यंदा सोयाबीन काढणीनंतर २५१ हेक्टर क्षेत्रावर नवीन लागवड झाली आहे.
तालुक्याचे प्रमुख पिक म्हणून ओळख असलेल्या ऊस पिकाची लागवड गेल्या काही वर्षापासून अत्यल्प पर्जन्यमानामुळे बंद झाली होती. पाण्याच्या कमतरतेमुळे ऊसाचे क्षेत्र घटले होते. जिरायती पिकांना मिळणारे अल्पदर व ऊसाची मिळणारी एकरकमी चांगली रक्कम पाहता व तसेच शाश्वत पाण्यामुळे तालुक्यातील शेतकरी पुन्हा ऊस लागवडीकडे वळले आहेत. मांजरा, घरणी, लेंडी नद्यामुळे तालुक्यातील जमीन सुपीक बनली आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी नदी काठच्या भागात व घरणी, साकोळ प्रकल्पासह डोंगरगाव बॅरेजमुळे मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केले जाई मात्र सततच्या अवर्षणामुळे नद्यांमध्ये पाणी शिल्लक राहिले नाही. पाण्याचा प्रश्न गंभीर होत गेल्याने बागायती पिकांऐवजी जिरायती पिकांकडे शेतक-यांचा कल वाढला होता मात्र यंदा संततधार पाऊस व त्यानंतर परतीच्या पावसात नद्यासह प्रकल्पात मुबलक पाणीसाठा झाल्याने शेतकरी पुन्हा ऊस लागवडी वळले आहेत.
सोयाबीन काढणीनंतर मोठे क्षेत्र उपलब्ध झाल्याने शेतक-यांंनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवडीला सुरूवात केली असून मुबलक पाणी व योग्य नियोजनामुळे सध्या ऊस पिक जोमात आले आहे. पाण्याचे महत्त्व लक्षात घेता अनेक शेतक-यानी आधुनिक तर काहींनी पारंपारिक पद्धतीने ऊस लागवड केली असून यंदा ऊस उत्पादनातून शेतक-यांंना चांगला आर्थिक फायदा होणार आहे.