मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ‘शिवशाही’ या वातानुकूलित बससेवेने खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना जबरदस्त स्पर्धा निर्माण केली होती. एक काळ होता, जेव्हा ‘शिवशाही’ ही सेवा प्रवासी वर्गामध्ये विशेष लोकप्रिय ठरली होती.
मात्र आता ही सेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येत असून, तिचे रूपांतर ‘हिरकणी’ या नव्या सेवेत करण्यात येत आहे. शिवशाहीच्या जागी बसवलेली पहिली ‘हिरकणी’ बस एसटीच्या ताफ्यात समाविष्ट झाली असून, लवकरच ती प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
एसटीने घेतलेल्या निर्णयानुसार, शिवशाही बसचा वापर थांबवत तिचे रूपांतर ‘हिरकणी’ बसमध्ये करण्याचे नियोजन सुरू झाले आहे. पुण्यातील दापोडी येथील मुख्य वर्कशॉप आणि छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा केंद्रात ही कामं प्रगतिपथावर आहेत. ताज्या घडामोडीनुसार, टाटा कंपनीच्या एका शिवशाही बसचे यशस्वी रूपांतर ‘हिरकणी’ बसमध्ये झाले आहे.
८ वर्षांतच घसरण
शिवशाही बससेवा १० जून २०१७ रोजी मुंबई-रत्नागिरी मार्गावर पहिल्यांदा सुरू करण्यात आली होती. त्यावेळचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या पुढाकाराने ही सेवा सुरू झाली. लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी किफायतशीर, वातानुकूलित आणि आरामदायी अशी ही सेवा ७५ मार्गांवर धावत होती. या बसमध्ये आसन आणि शयनयान दोन्ही प्रकार होते.
शिवशाही बससेवा एसटी महामंडळ आणि खासगी कंत्राटदारांच्या भागीदारीत चालवली जात होती. यासाठी सात कंत्राटदार नेमण्यात आले होते. त्यापैकी चार कंत्राटदारांनी आसन व्यवस्था असलेल्या बस चालवल्या तर उर्वरित तिघांनी शयनयान बस चालवल्या.
शिवशाही हद्दपार
एसटीकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिली ‘हिरकणी’ बस तयार झाली असून, उर्वरित शिवशाही बसही टप्प्याटप्प्याने या नव्या ब्रँडमध्ये रूपांतरित होणार आहेत. लवकरच शिवशाही बस रस्त्यावरून हद्दपार होईल आणि तिची जागा ‘हिरकणी’ घेईल.