लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्याच्या कृषी संस्कृतीचे अविभाज्य अंग असलेली वेळाअमावस्या अर्थात येळवस दि. ११ जानेवारी रोजी जिल्हाभरात उत्साहात साजरी करण्यात आली. अगदी सकाळी-सकाळी लातूर शहरातील माणसं आपापल्या शेताकडे निघाली. नातेवाईक, मित्र, स्नेही, ओळखी, पाळखीचेही शिवारात गेल्याने शेत-शिवारं माणसांनी बहरली तर लातूर शहर सायंकाळपर्यंत ओस पडले होते.
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांसह कर्र्नाटकातील सीमावर्ती भागात येळवस साजरी केली जाते. शिवारपूजा, वेळाअमावस्या, वेळमाशी, येळवस, अशा विविध नावांनी या सणाची ओळख आहे. या सणाला जिल्हाधिकारी सुटी देतात. त्यामुळे सुटीत वनभोजनाचा आनंद घेण्यासाठी लातूर शहरातील महिला, पुरुष, मुलं, मुली, आबाल-वृद्ध सर्वच जण शेत-शिवारात जातात. गुरूवारी सकाळी सकाळी शेताकडे जाणा-यांची धांदल सुरू झाली. दुपारपर्यंत संपूर्ण लातूर शहर रिकामे झाले. नेहमीच गजबज असलेल्या गंज गोलाई, मार्केट यार्डसह इतर बाजारपेठेत शुकशुकाट होता. अभावानेच एखादा दुसरा दिसत होता. सर्व रस्ते निर्मनुष्य झाले होते. अघोषित संचारबंदी असल्यासारखे दिसत होते. सायंकाळ झाली आणि शेत-शिवारातून माणसं परत शहराकडे फिरली आणि शहरातील रस्ते पुन्हा गजबजले.