24.9 C
Latur
Monday, May 26, 2025
Homeअंतरराष्ट्रीयशेकडो ड्रोन, क्षेपणास्त्रांनी युक्रेनवर हल्ला; १३ ठार

शेकडो ड्रोन, क्षेपणास्त्रांनी युक्रेनवर हल्ला; १३ ठार

झायटोमिर : वृत्तसंस्था
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला केला, ज्यामध्ये देशातील विविध शहरांवर ३६७ ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागण्यात आली. या भयानक हल्ल्यात झायटोमिरमध्ये तीन मुलांसह १३ लोकांचा मृत्यू झाला. अनेक लोक जखमी झाले आहेत. कीव, खारकिव, मायकोलायव्ह, टेर्नोपिल आणि खमेलनित्स्की यांसारख्या प्रमुख शहरांवर हल्ला झाला.

युक्रेनच्या हवाई दलाने २६६ ड्रोन आणि ४५ क्षेपणास्त्र पाडली, परंतु असं असूनही अनेक अपार्टमेंट इमारती आणि पायाभूत सुविधांचे मोठं नुकसान झालं आहे. हा युद्धातील आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला मानला जात आहे. राजधानी कीवमध्ये ११ जण जखमी झाले. तसेच खमेलनित्स्कीमध्ये चार जणांचा मृत्यू झाला.

युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळातील अमेरिकेच्या कमकुवत प्रतिसादावर टीका केली आणि रशियाविरुद्ध कठोर निर्बंध घालण्याची मागणी केली आहे.

दबावाशिवाय काहीही बदलणार नाही. रशिया आणि त्याचे मित्र राष्ट्र पाश्चात्य देशांमध्येही अशाच प्रकारच्या नरसंहाराची तयारी करतील. मॉस्कोकडे शस्त्रे तयार करण्याची क्षमता आहे तोपर्यंत तो लढेल, असं युक्रेनच्या राष्ट्रपतींचे चीफ ऑफ स्टाफ आंद्रेई यरमाक यांनी टेलिग्रामवर म्हटलं आहे. रशियाने दावा केला की, त्यांनी अवघ्या चार तासांत युक्रेनचे ९५ ड्रोन पाडले आहेत, त्यापैकी १२ मॉस्कोजवळ होते.

युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यातून पुतीन बचावले
आज रशियाने युक्रेनमधील अनेक भागांवर शेकडो ड्रोनच्या मदतीने मोठा हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच युक्रेननेही रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर ड्रोन हल्ला केल्याचं समोर आलं आहे. मात्र रशियन सैन्याने वेळीच सतर्क होत हे ड्रोन नष्ट केल्याने मोठी दुर्घटना टळली, रशियातील कुर्स्क भागातून पुतीन यांचं हेलिकॉप्टर जात असताना युक्रेनकडून या ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला. घटनेमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. रशियाच्या हवाई संरक्षण प्रणाली पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देत हे ड्रोन पुतीन यांच्या उड्डाण मार्गात येण्यापूर्वीच नष्ट केले. या घटनेत कुणाला दुखापत झाल्याचं किंवा राष्ट्रपतींच्या ताफ्यातील कुणाला काही नुकसान झाल्याची माहिती नाही. आता रशियाच्या सुरक्षा यंत्रणांकडून या घटनेची पूर्ण चौकशी केली जात आहे. मात्र याबाबत युक्रेन सरकार आणि सैन्यदलाकडून कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR