25 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeपरभणीशेती व्यवसायास ड्रोन तंत्रज्ञानाची जोड आवश्यक : प्रा. डॉ. सिंह

शेती व्यवसायास ड्रोन तंत्रज्ञानाची जोड आवश्यक : प्रा. डॉ. सिंह

परभणी : हवामान बदलामुळे शेतीमध्ये तापमान वाढ आणि पर्जन्यमानामध्ये अनिश्चितता निर्माण होत आहे. भविष्यात हवामान बदलाची समस्या अधिक वाढू शकते. पहिली हरितक्रांती ओलिताखालील शेतीमध्ये झाली परंतु दुसरी हरितक्रांती पर्जन्यमानावर आधारित असलेल्या कोरडवाहू शेतीमध्ये येणार आहे. यासाठी अचूक शेती पद्धती अवलंबणे आवश्यक आहे. यासाठी सर्वांनी शेती व्यवसायास ड्रोन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ग्वाल्हेरचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. अनिल कुमार सिंह यांनी केले.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग (महाराष्ट्र शासन) यांचे संयुक्त विद्यमाने रबी पिक परिसंवाद दि.१७ सप्टेंबर रोजी कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा.डॉ. इन्द्र मणि होते. मुख्य अतिथी ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथील राजमाता विजयाराजे सिंधीया कृषि विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू तथा भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापनचे माजी उप महासंचालक प्रा. डॉ. अनिल कुमार सिंह, विशेष अतिथी बुलंदशहर (उत्तर प्रदेश) येथील सनशाईन व्हिजीटेबल प्रा. लि. चे संचालक कर्नल सुभाष दैशवाल उपस्थित होते. यावेळी शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, नियंत्रक प्रवीण निर्मळ, विद्यापीठ अभियंता दीपक कशाळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना माजी कुलगुरू प्रा.डॉ. अनिल कुमार सिंह म्हणाले की, जलसंधारणास प्राधान्य देऊन पावसाच्या पाण्याचे साठवणूक करावी. पाण्याचा पुरेपूर वापर होण्याच्या दृष्टीने रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब करावा. शेतक-यांनी आर्थिक नुकसान कमी करण्याच्या दृष्टीने एकात्मिक शेतीस प्राधान्य द्यावे असे नमूद केले.

यावेळी कर्नल दैशवाल म्हणाले की, शाश्वत शेती व्यवसायासाठी योग्य शिक्षणाची गरज असते. शेतक-यांनी स्वत: शेतीचे योग्य ज्ञान घेऊन शेतीमध्ये तज्ञ होणे आवश्यक आहे. गट शेतीतून आपसातील ज्ञानाचा शेतक-यांना लाभ करून घेता येतो असे सांगितले.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, जमीन आणि पाणी व्यवस्थापन हे विद्यापीठाचे एक प्रमुख कार्य आहे. या दृष्टीनेच विद्यापीठाचे शेतकरी केंद्रित विस्तार कार्य सुरू आहे. विद्यापीठाचे विस्तार कार्य हे व्यक्ती केंद्रित नसून व्यवस्था केंद्रित आहे असे नमूद केले.
प्रस्ताविकात विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी कार्यक्रमाचे आयोजन आणि विद्यापीठाच्या विस्तार कार्याबद्दल माहिती दिली. सूत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव आणि डॉ. प्रीतम भुतडा यांनी तर आभार मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी मानले. शेतक-यांनी विचारलेल्या शेतीविषयक प्रश्नांना विद्यापीठाच्या शास्त्रज्ञाने समाधानकारक उत्तरे दिली. या कार्यक्रमामध्ये हजारो शेतकरी प्रत्यक्ष उपस्थित राहून उस्फुर्त प्रतिसाद दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR