22.9 C
Latur
Thursday, December 5, 2024
Homeलातूरश्री देशिकेंद्र विद्यालयाची तनुश्री बांगे बनली ‘लखपती’

श्री देशिकेंद्र विद्यालयाची तनुश्री बांगे बनली ‘लखपती’

लातूर : प्रतिनिधी
येधील महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेद्वारा संचलित श्री देशिकेंद्र विद्यालयाची विद्यार्थिनी कु.तनुश्री तुकाराम बांगे हिने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी बोर्ड) परीक्षेत  तिन्ही भाषा विषयात राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला असून त्यामुळे ती माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्या  कै.निळकंठराव खाडिलकर पुरस्काराची मानकरी ठरली असून हे पारितोषिक  माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाने २८ नोव्हेंबर रोजी जाहीर केले आहे.
या पारितोषिकाची रक्कम तब्बल एक लाख सहाशे ब्याण्णव रुपये असून असा लखपती पारितोषिक पटकावणारी ती विद्यालयाची पहिलीच विद्यार्थीनी ठरली आहे. कु.तनुश्री बांगे हिने मार्च २४ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत  (दहावी बोर्ड) परीक्षेत मराठी(प्रथम भाषा) विषयात ९९, संस्कृत(द्वितीय भाषा)विषयात १०० तर  इंग्रजी (तृतीय भाषा) विषयात ९८ असे गुण मिळवून तिन्ही विषयांत राज्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला आहे. यामुळे  महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव माधवराव पाटील टाकळीकर यांच्या हस्ते कु.तनुश्री बांगे तसेच वडील तुकाराम बांगे यांचा विद्यालयातर्फे मंगळवार (दि.३) रोजी सत्कार करण्यात आला व कै. निळकंठराव खाडिलकर पारितोषिकाचा धनादेश सुपुर्द करण्यात आला. यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक प्रदीप दिंडेगावे, संचालक बस्वराज येरटे तसेच मुख्याध्यापक रुपसिंग सगर यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यालयातील शिक्षकांचे यथोचित मार्गदर्शन, नियमित अभ्यास व पालकांचे प्रोत्साहन यामुळे या महत्त्वाच्या पारितोषिकाचा सन्मान मिळवू शकले असे कु. तनुश्री बांगे हिने यावेळी सांगितले. या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक शिवानंद स्वामी यांनी केले. यावेळी विद्यालयातील सर्व पर्यवेक्षक, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR