15.2 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeसंगमनेर पेटले, विखे-थोरात वाद चिघळणार?

संगमनेर पेटले, विखे-थोरात वाद चिघळणार?

अहिल्यानगर : विशेष प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत संगमनेरमध्ये मात्र एक वेगळाच वाद उफाळून आला. त्यामुळे संगमनेर पेटले असून हे प्रकरण चिघळण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्याबाबत वसंतराव देशमुख यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यावेळी माजी खासदार सुजय विखे पाटील हे पण मंचावर उपस्थित होते. मात्र त्यांनी त्यांना त्यावेळी रोखलं नाही. यावरून संगमनेर तालुक्यात जाळपोळ, तोडफोडीच्या घटना घडल्या. या प्रकरणाची केंद्रीय गृह मंत्रालयाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे.

वसंतराव देशमुख यांनी जाहीर कार्यक्रमात केलेले वादग्रस्त वक्तव्य वा-यासारखे संपूर्ण संगमनेरमध्ये पसरले. त्यानंतर त्याचे तिव्र पडसाद संपूर्ण तालुक्यात उमटले आहेत. याप्रकरणी जयश्री थोरात यांनी थेट पोलिस स्टेशन गाठले आणि देशमुख यांच्या अटकेची मागणी केली.

भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी सध्या संगमनेरमध्ये विशेष लक्ष घातले आहे. त्यातून त्यांच्या बैठकाही सुरू आहेत. त्यातून त्यांनी युवा संकल्प मेळावे सुरु केले आहेत. शुक्रवारी धांदरफळ येथे ही ते मेळाव्याला उपस्थित होते. त्यावेळी बोलताना वसंतराव देशमुख यांची जिभ घसरली. त्यांनी थेट बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री यांच्याबाबत खालच्या पातळीवरचे वक्तव्य केले. एका महिलेबाबत असं वक्तव्य केल्याने सभेतील महिलांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर धांदरफळ येथील महिलांनी सुजय विखे यांच्या युवा संकल्प मेळावा मंचाचा ताबा घेत कारवाईची मागणी केली.

दरम्यान, काँग्रेसचे कार्यकर्ते भलतेच आक्रमक झाले. जयश्री थोरात यांनी तर कार्यकर्त्यांसह रात्रभर संगमनेर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केले. आक्षेपार्ह वक्तव्य करणा-या वसंतराव देशमुख यांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR