27.2 C
Latur
Friday, November 8, 2024
Homeक्रीडासंघापेक्षा कोणीही मोठे नाही

संघापेक्षा कोणीही मोठे नाही

सूर्यकुमारचे वक्तव्य

नवी दिल्ली : संघापेक्षा कोणीही मोठे नाही, असा दावा टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी केला. भारताने तिस-या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात बांगलादेशचा १३३ धावांनी दारुण पराभव केला आणि ही मालिका ३-० ने जिंकली. या विजयानंतर सूर्यकुमारने हे वक्तव्य केले. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर भारतीय फलंदाजांनी कर्णधार सूर्यकुमारचा निर्णय योग्य ठरवत धावांचा डोंगर उभा केला.

भारताने प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसनच्या १११ धावा, सूर्यकुमार यादवच्या ७५ धावा आणि या दोन्ही खेळाडूंच्या रेकॉर्डब्रेक १७३ धावांच्या भागीदारीसह विक्रमी २९७ धावा केल्या. तर बांगलादेशचा संघ २० षटकांत ७ गडी गमावून केवळ १६४ धावा करू शकला. बांगलादेशकडून तौहीद हृदयॉयने सर्वाधिक नाबाद ६३ धावांची खेळी खेळली. तौहीद हृदयॉयशिवाय लिटन दासने ४२ धावा केल्या. भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर बोलताना कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला, एक संघ म्हणून आम्ही खूप काही साध्य केले आहे.

मला या संघात नि:स्वार्थी क्रिकेटपटू पाहिजेत. जसे हार्दिकने सांगितले त्याप्रमाणे आम्हाला मैदानावर, मैदानाबाहेर असतानाही एकमेकांच्या यशाचा आनंद घ्यायचा आहे. आम्ही सर्वच एकमेकांबरोबर खूप वेळ घालवतो आणि मैदानावर खेळतानाही आम्ही याचा आनंद घेतो, असेही सूर्यकुमार म्हणाला.

सूर्या पुढे बोलताना म्हणाला, संघाच्या मीटिंगमध्ये किंवा चर्चा करतानाही हा विषय असतो आणि गौती भाई (गौतम गंभीर) नेही मालिकेच्या सुरुवातीला आणि श्रीलंका दौ-यावर होतो तेव्हाही हेच सांगितले होते की, संघापेक्षा कोणीही मोठे नाही. तुम्ही ९९ वर खेळताय किंवा ४९ वर खेळताय पण जर तुम्हाला वाटले या चेंडूवर मोठा फटका खेळून चेंडू सीमारेषेपलीकडे पाठवायचा आहे तर तुम्हाला तसे शॉट मारायला यायला हवेत आणि संजूने नेमके तेच केले, मी त्याच्यासाठी खूप जास्त आनंदी आहे. या मालिकेत सर्वांनी जी कामगिरी केली आहे, ती अप्रतिम आहे, असेही तो म्हणाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR