बुलडाणा : प्रतिनिधी
शिवसेना शिंदे गटातील आमदार विविध कारणांमुळे चर्चेत असतात. त्यांनी आपल्या प्रवृत्तीचे अनेकदा ओंगळवाणे प्रदर्शन केले आहे. यातच आमदार गायकवाड यांनी ‘लाडक्या पुत्राला’ वाढदिनी तलावारीने केक भरवला आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
दरम्यान, बुलडाण्यातील आमदार संजय गायकवाड हे धमक्या देणे, मारहाण करणे यासाठी नेहमीच चर्चेत राहतात. गुरुवारी (१५ ऑगस्ट) संजय गायकवाड यांनी त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड यांचा वाढदिवस बुलडाण्यातील जैस्तंभ चौकात साजरा केला. हे बुलडाण्यातील वर्दळीचे ठिकाण समजले जाते. अशा वर्दळीच्या ठिकाणी युवासेनेचे जिल्हाप्रमुख मृत्युंजय गायकवाड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यातच सगळ्यांचे लक्ष वेधले ते मृत्युंजय गायकवाड यांना तलवारीने भरवलेल्या केकने.
संजय गायकवाड यांनी तलवारीने केक कापून मुलाला भरवला. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. संजय गायकवाड हे शिवसेनेकडून सलग दुस-यांदा बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. शिवसेनेत बंड झाल्यानंतर आमदार गायकवाड यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात उडी मारली. बेताल वक्तव्ये करणे, धमक्या देणे, मारहाण करणे, अशा गोष्टींसाठी संजय गायकवाड प्रसिध्द आहेत.