मुंबई : प्रतिनिधी
मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर खासदार संजय राऊत आणि रोहित पवार यांनी महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा गंभीर आरोप केला होता. यावरून आता गोरे यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला.
दरम्यान, राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. महायुतीमधील अनेक नेत्यांवर विरोधकांनी जोरदार टीका आणि गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी देखील राजीनामा दिला आहे.
यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जयकुमार गोरे यांनी एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवले असल्याचा आरोप खासदार संजय राऊत आणि आमदार रोहित पवार यांच्याकडून करण्यात आला. त्यामुळे आता जयकुमार गोरे यांनी आक्रमक पवित्रा घेत नेत्यांवर हक्कभंगाचा प्रस्ताव सादर केला आहे.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून अनेक मुद्यांवरून ते गाजते आहे. यामध्ये भूमिका मांडताना मंत्री जयकुमार गोरे यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला आहे. याबाबत बोलताना जयकुमार गोरे म्हणाले की, २०१७ मधील सातारा न्यायालयातील प्रकरण ४७९ चा आधार घेऊन त्याबाबत मीडियामधून माझ्यावर बिनबुडाचे, अश्लाघ्य, आक्षेपार्ह भाषा वापरून बेछूट आरोप करण्यात आले.
माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला. माझी जनमानसातील प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला. सदर गुन्ह्यात न्यायालयाने २०१९ मध्येच मुक्तता केली आहे. न्यायालयाने निकालपत्र दिले आहे, तरी संजय राऊत यांनी मीडियासमोर येऊन जाणीवपूर्वक माझी बदनामी केली. त्यामुळे त्यांनी माझा व सभागृहाचा विशेषाधिकार भंग केला. न्यायालयाचा अवमान केला. सार्वभौम सभागृहाचा आपमान केला आहे. म्हणून मी ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडतोय’’ असे मत जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले आहे.