ठाणे : प्रतिनिधी
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात झालेल्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय सहकारी संस्थांच्या जागतिक चर्चासत्रात भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेडचे अध्यक्ष शरद गांगल यांना मिळाला. या सहभागामुळे आंतरराष्ट्रीय पटलावर भारतीय सहकार क्षेत्राची दखल घेतली गेली. ठाणेकर शरद गांगल यांचा सहभाग समस्त ठाणेकरांसाठी गौरवास्पद आणि टीजेएसबी सहकारी बँकेसाठी अभिमानास्पद ठरला.
या परिषदेत जनता सहकारी बँक पुणेचे अध्यक्ष रवींद्र हेजीब हेही सहभागी झाले होते. जागतिक स्तरावर सहकारी बँकांचे प्रतिनिधित्व करणा-या इंटरनॅशनल को-ऑपरेटिव्ह अलायन्सच्या अंतर्गत कार्यरत इंटरनॅशनल को-ऑपरेटिव्ह बँकिंग असोसिएशनद्वारे या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन शरद गांगल यांना विशेष निमंत्रण पत्र पाठवून आमंत्रित केले होते.
सर्वसमावेशक आर्थिक वृद्धी हा परिषदेचा केंद्रबिंदू होता. या दोन दिवसीय उच्चस्तरीय जागतिक परिषदेत सहकारी बँका आणि क्रेडिट युनियन्सच्या माध्यमातून शाश्वत वित्तीय प्रणाली कशी उभारता येईल, यावर विचारमंथन झाले. सहकारातून समताधिष्ठित आणि शाश्वत विकास यावर परिषदेत भर देण्यात आला. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी वित्तीय साहाय्य करून त्याचे सक्षमीकरण, शेतकरी आणि महिला उद्योजकांच्या आर्थिक उन्नतीसाठी नावीन्यपूर्ण योजना राबवणे, समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांना मुख्य आर्थिक प्रवाहात आणणे आणि मध्यमवर्गीयांची घराच्या स्वप्नपूर्तीसाठी मध्यमवर्गीय सुलभ गृहकर्ज उपलब्ध करून देणे यावर चर्चा झाली. संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात जागतिक धोरणांवर चर्चा झाली. टीजेएसबी बँकेच्या नेतृत्वामुळे ठाण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.
















