नवी दिल्ली : वृत्तसंस्था
इतिहासात प्रथमच भारतीय संरक्षण क्षेत्राने विक्रमी निर्यात केली आहे. मागील आर्थिक वर्षीच्या तुलनेत यावर्षी संरक्षण निर्यातीत ३२.५ टक्क्यांची वाढ झाली आहे. भारताने प्रथमच २१ हजार कोटींचा टप्पा पार केला. यात खाजगी क्षेत्राचे योगदान ६० टक्के तर संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांचे योगदान ४० टक्के आहे. ही वृद्धी भारतीय संरक्षण उत्पादने आणि तंत्रज्ञानाच्या जागतिक मान्यतेचे प्रतिबिंब आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीटरवर संरक्षण निर्यातीच्या संदर्भातील माहिती दिली. हा नवा टप्पा पार केल्याबद्दल त्यांनी सर्व संबंधितांचे अभिनंदन केले.
आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये संरक्षण निर्यातीने विक्रमी २१,०८३ कोटी ( सुमारे २.६३ अब्ज अमेरिकन डॉलर्स) रुपयांचा उच्चांक गाठला. जी गेल्या आर्थिक वर्षातील १५,९२० कोटी रुपयांच्या संरक्षण निर्यातीच्या तुलनेत ३२.५ टक्क्यांनी अधिक आहे. आर्थिक वर्ष २०१३-१४ च्या तुलनेत गेल्या १० वर्षांत संरक्षण निर्यात ३१ पटीने वाढल्याचे या ताज्या आकडेवारीवरून दिसून आले.
आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये संरक्षण निर्यातदारांना जारी करण्यात आलेल्या निर्यात परवान्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील १,४१४ निर्यात परवान्यांच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये ही संख्या १,५०७ वर पोहोचली आहे. दोन दशकांची तुलनात्मक आकडेवारी म्हणजे २००४-०५ ते २०२३-१४ आणि २०१४-१५ ते २०२३-२४ या कालावधीत संरक्षण निर्यातीत २१ पट वाढ झाल्याचे दिसून येते. २००४-०५ ते २०२३-१४ या कालावधीत एकूण संरक्षण निर्यात ४,३१२ कोटी रुपये होती. जी २०२४-१५ ते २०२३-२४ या कालावधीत ८८,३१९ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच भारताने संरक्षण निर्यातीत २१ हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारताची संरक्षण निर्यात २१,०८३ कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत निर्यातीत वाढ झाली आहे. ही वाढ ३२.५ टक्क्यांची एवढी मजबूत आहे.
खाजगी क्षेत्रातील
योगदान ६० टक्के
संरक्षण उद्योग, संरक्षण क्षेत्रातील खासगी कंपन्या आणि सार्वजनिक उपक्रमांनी सर्वोच्च संरक्षण निर्यात साध्य करण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले आहेत. या आकडेवारीत खासगी क्षेत्र आणि संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांचे योगदान अनुक्रमे ६० टक्के आणि ४० टक्के आहे.
संरक्षण क्षेत्राची
अभूतपूर्व उंची
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण क्षेत्रातील निर्यातीसंदर्भात माहिती दिली. भारताच्या संरक्षण क्षेत्राने अभूतपूर्व उंची गाठली आहे. यामध्ये नवीन विक्रम केल्याचे राजनाथ सिंह म्हणाले. भारत सरकारने आत्मनिर्भर भारतला गती दिली. तसेच संरक्षण क्षेत्रातील उत्पादने आयात करण्याऐवजी भारतातच बनविण्यावर भर दिला. त्याचे हे सकारात्मक परिणाम असल्याचेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.