कॉंग्रेस नेते पटोले यांचा अजित पवारांना संतप्त सवाल
मुंबई : प्रतिनिधी
माझ्या हातात राज्य सरकारची तिजोरी आहे. त्यामुळे माझ्या घड्याळाच्या पाठीशी उभा राहिलात तर बारामतीसारखे काम तुमच्याकडे करू, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नळदुर्ग नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत केले. यावर काँग्रेस नेते नाना पटोलेंनी संविधानाने तुम्हाला तिजोरी लुटण्याचा अधिकार दिलाय का, असा संतप्त सवाल केला.
विकासाच्या नावावर मतदान मागा, भ्रष्टाचाराला खतपाणी घालू नका. तुम्ही जनतेचे नोकर आहात, पाच वर्षासाठी सत्ता तुमच्या हातात आहे. मालकासारखे बोलू नका. महाराष्ट्राची जनता तुमचा गर्व चूर करेल, अशी टीका नाना पटोले यांनी अजित पवार यांच्यासह सत्ताधा-यांवर केली. अर्थमंत्री असले म्हणजे काय झाले? राज्याची सगळी तिजोरी तेच लुटून नेऊ शकतात आणि त्यांनाच सगळे अधिकार संविधानाने दिले असे नाही. मतदान मागत असताना विकासाच्या नावाने मागा ना. विकास काय… विकासात भ्रष्टाचाराची जास्त साथ आहे. विकासाचे नाममात्र चित्र तिथे दिसत आहे. एकीकडे फडणवीस येऊन सांगतात की, मी मुख्यमंत्री आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे सांगतात की मी उपमुख्यमंत्री आहे. या लोकांनी महाराष्ट्राच्या तिजोरीचे तुकडे करून टाकलेत का, असे त्यांनी म्हटले.
सत्तेतून काढण्याचा
अधिकार जनतेलाच
तुम्ही अगोदर डोक्यातून काढले पाहिजे की, तुम्ही मालक नाहीत. तुम्ही जनतेचे नोकर आहात. पाच वर्षासाठी तुम्हाला त्या ठिकाणी पाठवलेले आहे. याचा अर्थ तुम्ही मालकासारखे बोलू नका. जनता तुम्हाला मालक बनवत असेल, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला सत्तेतून काढण्याचाही अधिकार जनतेलाच आहे. हे जे वक्तव्य आहे ते सत्तेचा गर्व झालेला आहे, असे पटोले म्हणाले.

