25.8 C
Latur
Friday, December 27, 2024
Homeमहाराष्ट्रसतीश वाघ यांच्या हत्येची पत्नीनेच दिली सुपारी

सतीश वाघ यांच्या हत्येची पत्नीनेच दिली सुपारी

वाघ हे आमदार टिळेकर यांचे मामा, पत्नीला अटक
पुणे : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा खून पत्नीने घडवून आणल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली आहे. वाघ यांच्या जाचामुळे पत्नीने मारेक-यांना पाच लाख रुपयांची सुपारी दिल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी तिला बुधवारी रात्री अटक केली.

या प्रकरणी मोहिनी सतीश वाघ (५३, रा. फुरसुंगी) यांना अटक करण्यात आली. वाघ यांच्या खून प्रकरणात यापूर्वी आतिश जाधव, पवन श्यामकुमार शर्मा (३० रा. शांतीनगर, धुळे), नवनाथ अर्जुन गुरसाळे (३२ रा. अनुसया पार्क, वाघोली), अक्षय हरीश जावळकर, विकास शिंदे यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अक्षय जावळकर हा सतीश वाघ यांच्याकडे भाडेकरू म्हणून राहत होता. वाघ आणि अक्षय यांच्यात वाद झाले होते. त्यांनी अक्षयला खोली सोडण्यास सांगितले होते. मोहिनी यांच्याशी असलेली जवळीक त्यांना खटकली होती. वाघ यांच्या जाचामुळे पत्नी मोहिनी यांनी अक्षयला पतीचा काटा काढण्यास सांगितले.

पतीच्या खुनासाठी त्यांनी पाच लाख रुपयांची सुपारी दिली. त्यानंतर अक्षयने सराइत गुन्हेगार पवन शर्मा याला सुरुवातीला दीड लाख रुपये दिले. वाघ दररोज सकाळी फिरायला जायचे. नऊ डिसेंबर रोजी ते नेहमीप्रमाणे सकाळी बाहेर फिरायला गेले. आरोपी अक्षय, पवन, नवनाथ, विकास, आतिश यांनी वाघ यांचे मोटारीतून अपहरण केले. धावत्या मोटारीत वाघ यांच्यावर आरोपींनी चाकूने ७२ वार केले. त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटातील ऊरळी कांचन परिसरात टाकून आरोपी पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी तपास करुन आरोपींना अटक केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR