28.7 C
Latur
Monday, June 17, 2024
Homeमहाराष्ट्रसत्तास्थापनेसाठी महाराष्ट्राचा निकाल निर्णायक

सत्तास्थापनेसाठी महाराष्ट्राचा निकाल निर्णायक

मुंबई : प्रतिनिधी
लोकसभेच्या जागा पाहिल्या तर उत्तर प्रदेशनंतर दुस-या नंबरच्या जागा महाराष्ट्रात आहेत. बिहार, उत्तर प्रदेश आणि राजस्थानात जागांची घट होणार आहे. ही घट भरून काढण्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्रावर भाजपची भिस्त आहे. पण या दोन्ही राज्यांतही घट झाली तर अडचण होईल. महाराष्ट्राचा निकाल हा भाजपला सत्तेत आणण्यासाठी निर्णायक असणार आहे.
दरम्यान, राज्यातील पाच टप्प्यांतील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले आहे. तर देशातील सहावा टप्पाही पार पडला आहे. येत्या १ जून रोजी सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यानंतर ४ जून रोजी निकाल लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे कयास वर्तवले जात आहेत. भाजप ४०० पार करणार का? मोदींची हॅट्ट्रिक होईल का? महाराष्ट्रात मोडतोड केल्यानंतरही भाजपला अपेक्षित जागा मिळणार का? अशी वेगवेगळी मतमतांतरे व्यक्त केली जात आहेत.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांनंतर पंतप्रधान मोदींची जादू देशभर चालली परंतु २०२४ च्या निवडणुकांमध्ये अनेक भागांत मोदींची लोकप्रियता कमी होत आहे. महाराष्ट्रातल्या अनेक भागात महायुतीला प्रचारासाठी मोठी कसरत करावी लागली.

दुष्काळ, अवकाळी पाऊस, सोयाबीन, कांदा व कापसाचा प्रश्न यामुळे शेतकरीवर्गाची नाराजी भाजप सरकारवर ओढवली आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा या बेल्टमध्ये जिथे कापूस आणि सोयाबीनचे मोठे उत्पादन होते तिथे शेतक-यांच्या नाराजीचा फटका सत्ताधा-यांना नक्कीच बसणार आहे. पूर्व विदर्भात जातीपातीचे राजकारणही अधिक निर्णायक ठरेल असे वाटते. डीएमके फॉर्म्युला म्हणजे दलित, मुस्लिम आणि कुणबी विशेषत: नागपूर, नागपूर शहर, वर्धा आणि चंद्रपूर येथे कुणबी फॅक्टर निवडणुकीवर परिणाम करेल. कुणबी फॅक्टर प्रामुख्याने काँग्रेस किंवा महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याने पूर्वी जिथे दीड ते ३ लाखांनी विजयी झालेले भाजपचे उमेदवार होते, त्यांना संघर्ष करावा लागला. तो संघर्ष दिसला आहे. कदाचित हा फॅक्टर काही ठिकाणचा निर्णय बदलूही शकतो असा स्पष्ट अंदाज राजकीय विश्लेषकांंनी व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडी सरस
दोन निवडणुकीत मोंदीची लाट होती. मागच्यावेळी महायुतीला ४१जागा मिळाल्या. यावेळी महायुती आणि महाविकास आघाडीला बरोबरीने जागा मिळतील असा अंदाज आहे. साधारणपणे २२ ते २४ जागा महायुतीच्या असतील. तर २४ ते २६ किंवा त्या आसपासच्या जागा महाविकास आघाडीला मिळतील. २४ पेक्षा थोड्या कमी जागा महायुतीला मिळतील. २४ पेक्षा थोड्या अधिक जागा महाविकास आघाडीला मिळतील.

ठाकरेंचा प्रचार आक्रमक
एकनाथ शिंदेंनी जागावाटपात त्यांना हव्या त्या जागा त्यांच्या पदरात पाडून घेतल्या. त्यांचा प्रचार चांगला झाला. प्रचारातील त्यांची सक्रियता चांगली होती. पश्चिम महाराष्ट्रात अजित पवार यांची सक्रियता चांगली होती. महाविकास आघाडीतील दोन पक्ष फुटल्याने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबतची सहानुभूती होती. महाविकास आघाडीतील सर्वांत मोठी बाजू म्हणजे उद्धव ठाकरे यांचा आक्रमक प्रचार होता. पूर्व विदर्भात उद्धव ठाकरे यांचा प्रचार कमी झाला. ज्या ठिकाणी प्रचार आक्रमक झाला तिथले निकाल आणि ज्या ठिकाणी ठाकरेंचा प्रचार कमी झाला तिथले निकाल यावर बरेचसे अवलंबून आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजप ‘चारसौ पार’ नाहीच
राज्यघटनेच्या मुद्यावर दलित आणि मुस्लिम मते कुठे जातात यावर बराचसा निकाल अवलंबून आहे. भाजप ४०० पार होणार नाही. वंचित मते घेईल. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी ९ मतदारसंघांत मोठी मते घेतली होती. यावेळी अकोला, हिंगोली परभणीच्या भागात थोडा फरक पडेल. वंचितला मते मिळतील. भिवंडी, शिर्डीतही ते मते घेतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR