सातारा : प्रतिनिधी
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते सत्यजितसिंह पाटणकर लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी पाटणकर गटाची सोमवारी (२६ मे) महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत सत्यजितसिंह यांच्या भाजप प्रवेशाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. सत्यजितसिंह शरद पवारांचे जवळचे माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे चिंरजीव आहेत.
पाटण विधानसभा मतदारसंघात विद्यमान पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांचे वर्चस्व आहे. सत्यजितसिंह यांना सलग तीनवेळा शंभुराज यांच्या विरोधात पराभव पत्करावा लागला आहे. २०२४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तिकिट न मिळाल्याने सत्यजितसिंह अपक्ष निवडणूक लढले. मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. तेव्हापासून ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा जोरात सुरू होत्या.
राज्यात महायुतीचे सरकार आहे. केंद्रात देखील एनडीएचे सरकार आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीच्या आधी सत्यजितसिंह मोठा निर्णय घेणार असल्याचे समोर येत आहे. त्यामुळेच आपली आगामी राजकीय वाटचाल ठरविण्यासाठी पाटणकर गटाने सोमवारी बैठक बोलवली आहे. माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार असल्याची माहिती पाटण पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार यांनी दिली आहे.
या बैठकीला सत्यजितसिंह पाटणकर, याज्ञसेन पाटणकर आणि तालुक्यातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत पदाधिका-यांशी चर्चा करून सत्यजित यांच्या भाजप प्रवेशाची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
२०१४ मध्ये सत्यजित हे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे चिरंजीव असल्याने त्यांच्या निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात होती.
मात्र, शंभुराज देसाई यांनी बाजी मारली. यानंतर शंभुराज देसाई यांचा राजकीय आलेख चढताच राहिल्याने सत्यजित यांना विजयाने नेहमीच हुलकावणी दिली. २०२४ ला महाविकास आघाडीकडून सत्यजित हे निवडणूक लढण्यास इच्छुक होते मात्र येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला तिकिट मिळाले अन् येथील राजकीय गणित बदलले. त्यामुळे सत्यजित यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागली होती.
पाटण पंचायत समितीमध्ये सत्ता
सत्यजित पाटणकर गटाकडे सध्या पाटण पंचायत समितीची एकहाती सत्ता आहे. सत्यजित पाटणकर सातारा जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात आहेत. नव्याने स्थापन केलेल्या शुगरकेन फॅक्टरीच्या माध्यमातून सत्यजित मतदारसंघातील शेतक-यांना देखील आकर्षित करण्याचा प्रयत्न करतायेत. त्यामुळे त्यांनी शरद पवारांची साथ सोडणे हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का मानला जातो आहे.