27.1 C
Latur
Tuesday, May 28, 2024
Homeसंपादकीय विशेषसबसे बडा रुपैय्या...

सबसे बडा रुपैय्या…

‘द होल थिंग इज दॅट की भय्या सबसे बडा रुपैय्या’ या ४७ वर्षांपूर्वीच्या गीतातील बोल त्या काळात, त्याआधी आणि आजपर्यंत समर्पक ठरत आले आहेत….आणि आणखी किती दिवस राहतील हे सांगता येणार नाही. अर्थात, समाजातील ठणठण गोपाळ असणारा सामान्य माणूस केवळ या ओळी फक्त गुणगुणतच राहतो. याउलट याचे महत्त्व हेरून येनकेनप्रकारे पैसा हडपण्याचे मार्ग अवलंबणारे अनेक जण आहेत. धीरज साहू यात ‘अग्रस्थानी’ ठरले आहेत. त्यांनी याबाबत विक्रम केला आहे. झारखंडच्या अधिकारी पूजा सिंघल यांच्याकडे ईडीच्या छाप्यात २० कोटींची रोकड सापडली होती. पीयूष जैन यांच्या घरी दोन वर्षांपूर्वी टाकलेल्या छाप्यात १५० कोटींची रोकड सापडली होती.

‘द होल थिंग इज दॅट की भय्या सबसे बडा रुपैय्या’ या सुमारे ४७ वर्षांपूर्वी मजरुह सुलतानपुरी यांनी लिहिलेल्या गीतांच्या ओळी भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळासाठीही तंतोतंत लागू पडतात. ‘सर्वांत मोठा पैसा’ या ब्रह्मवाक्याचे महत्त्व सर्वसामान्य व्यक्तीच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचे असून ते त्याला चांगले समजते आणि तो समजूनही घेत असतो. दुर्दैवाने तो ‘सबसे बडा रुपैय्या’पासून कोसो अंतरावर असतो आणि आहे. त्याचा खिसा रिकामा असून तो स्वत:ची स्थिती पाहून केवळ त्याच्याकडे या ओळी गुणगुण्याशिवाय काही पर्याय राहत नाही.

दुस-या बाजूला पैशाचे महत्त्व ओळखलेले धनाढ्य लोक असून त्यात काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. त्यांच्याकडे ४५० कोटी रुपयांपेक्षा अधिक रोकड आढळून आली आहे. साहू यांनी तर इतिहासच घडविला असून तो विक्रमच म्हणावा लागेल. साहू यांच्यासमोर झारखंडच्या आयएएस अधिकारी पूजा सिंघल तर काहीच नाहीत. त्यांच्याकडे ईडीच्या छाप्यात २० कोटी रुपयांची रोकड सापडली. पश्चिम बंगालचे शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांची मैत्रीण अर्पिता मुखर्जीची देखील यानिमित्ताने आठवण काढावी लागेल. तिच्याकडे २१ कोटींची रोकड हस्तगत करण्यात आली. उत्तर प्रदेशातील अत्तर व्यापारी पीयूष जैन देखील याबाबतीत मागे नाहीत. त्यांच्याकडे दोन वर्षांपूर्वीच्या छाप्यात १५० कोटींची रोकड सापडली होती.

प्राप्तिकर खात्याच्या इतिहासात सर्वाधिक वसुली म्हणून नोंदली गेली होती. अर्थात विक्रम तर मोडण्यासाठीच होतात. आता धीरज साहू यांनी ३०० कोटी रुपयांचा बेंचमार्क सेट केला आहे. पण जप्त न केलेली आणि हाती न लागलेली रक्कम ही कितीतरी पट अधिक असू शकते, हे देखील लक्षात ठेवा. रुपयाचे महत्त्व तामिळनाडूत ईडीचे अंकित तिवारी यांना चांगलेच कळाले आहे. त्यांना २० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. हीच स्थिती अहमदाबादेत ईडीचे उपसंचालक पी. के. सिंह आणि सहायक संचालक भुवनेशकुमार यांची होती. त्यांना पाच लाख रुपयांची लाच घेताना पकडले. मात्र धीरज साहू यांच्यासमोर तर ही मंडळी अगदीच ‘चिल्लर’ आहेत. म्हणजे पकडणारे आणि पकडले जाणारे या दोघांसाठी लोकशाहीची व्यवस्था सारखीच आहे. ज्याच्या हाती अगोदर पैसा लागेल, तो खरा धाडसी. कोणाच्या घराच्या भिंती या नोटांनी भरलेल्या आहेत तर काहींच्या घरी बॉक्स, पेटीत, गादीत, कपाटात नोटा खचाखच ठासून भरलेल्या आहेत. या प्रकरणात काहीच सांगू शकत नाही. शिपायापासून माननीयांपर्यंत सर्वच पारंगत आहेत. अभिनेता अजय देवगण याचा ‘रेड’ चित्रपट आठवा. तो कोठून कोठून पैसा काढतो, हे आपण पडद्यावर पाहिले आहे. प्रत्यक्षातही चित्र असेच असते.

अशा धाडसी लोकांत दिवंगत सुखराम यांचा समावेश करता येईल. १९९६ मध्ये सीबीआयच्या छाप्यात त्यांच्याकडे डझनभर सुटकेसमध्ये चार कोटी रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली. सुखराम हे दूरसंचार खात्याचे मंत्री होते आणि ते या पराक्रमामुळे खात्याचे मंत्री म्हणून ओळखण्याऐवजी लाचखोर नेते म्हणून प्रसिद्धीस पावले. सुखराम यांच्याकडे नोटा सापडल्या तेव्हा प्राप्तिकर खात्याचे आयुक्त आणि अधिकारीही थक्क झाले. आपण यापूर्वी कधीही एवढ्या नोटा पाहिल्या नाहीत, असे ते म्हणाले होते. परंतु १९९६ पासून आजपर्यंत २७ वर्षांत बराच बदल झाला आहे. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. चार कोटी कोठे आणि ३०० कोटी कोठे. यात खूपच प्रगती झाली आहे. एकदा इंदिरा गांधी यांनीच म्हटले,‘‘भ्रष्टाचार तर सार्वभौम बाब असून त्याला का घाबरायचे.’’ आता भीती तर संपलीच आहे आणि कालांतराने सर्व गोष्टी सामान्य होत गेल्या.

पैसा ही खरोखरच मोठी गोष्ट असून ती सर्वकाही कामे बिनदिक्कतपणे पार पाडते. त्यामुळेच तेलंगणाच्या निवडणुकीत शेकडो कोटी रुपयांची रोकड सापडली होती. त्याचवेळी खासदाराने संसदेत प्रश्न विचारणे आणि मतदान करणे हा एकप्रकारे पैसे कमविण्याचा ‘उद्योग’ ठरत आहे. म्हणूनच मायावती यांच्यावर पैसे घेऊन उमेदवारी देत असल्याचा आरोप केला गेला. या प्रकरणात कोणीही धुतल्या तांदळासारखे नाही. भारताला एका सूत्रात बांधणारा देखील रुपयाच आहे. कोठेही नजर फिरवा, जागोजागी पैसा लपलेला दिसतो आणि आढळतो. मग दक्षिण असो किंवा उत्तर असो. चार वर्षांपूर्वी प्राप्तिकर अधिका-यांनी तामिळनाडूच्या वेल्लोरमध्ये द्रमुक नेते पी. श्रीनिवासन यांच्या घरातून ११.५३ कोटी रुपये जप्त केले. परिणामी वेल्लोर लोकसभेची निवडणूक स्थगित करावी लागली. काही महिन्यांपूर्वी तामिळनाडूत ईडीने राज्याचे मंत्री के. पोनमुडी आणि त्यांचा खासदार मुलाच्या निवासस्थानातून सुमारे ८२ लाख रुपयांची रोकड पकडली. दुसरीकडे कर्नाटकात भाजपचे आमदार आणि त्यांच्या मुलाकडे सुमारे ८ कोटी रुपयांपेक्षा अधिक रोकड पकडली. चारा गैरव्यवहाराने नावाजलेल्या बिहारमध्ये १९९९ मध्ये राजद सरकारमधील आरोग्यमंत्री महावीर प्रसादांकडे सीबीआयने ८२ लाखांची रोकड जप्त केली.

राजद नेते आणि ‘चारा’ फेम लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव यांच्याकडे देखील ईडीने छापा घातला असता ७० लाखांची रोकड जप्त केली. दीड किलो सोने पकडले गेले. एवढेच नाही तर दीडशे कोटी रुपयांचा त्यांचा बंगला देखील ईडीने ताब्यात घेतलेल्या यादीत आहे. आता आपण केवळ रोकड जप्तीचा विषय करत आहोत. सोने, दागिने, मुदत ठेवी, शेअर, मालमत्ता, परदेशातील गुंतवणूक, आलिशान गाड्या याचा विचार केला तर चक्कर आल्याशिवाय राहणार नाही. त्याचा सध्या विचार करायला नको. आलिशान बंगले, जीवनशैली पाहून आपणही त्यांच्या खर्चाचे आकलन करू शकता. मात्र जप्त पैशाचे काय होते, हे मात्र समजत नाही. मग प्राप्तिकर खाते करकपात करून उर्वरित पैसा परत करतात का? किंवा हा पैसा सरकारच्या तिजोरीत जातो का? ज्यांच्याकडे एवढी रक्कम सापडते, त्यांचे काय होते? हे सर्व गूढच आहे. ज्यांच्यावर छापे पडतात, जप्ती होते ते तर कधी कंगाल झालेले दिसत नाहीत. कारवाईनंतरही त्यांच्या शाही राहणीमानात कोणताही बदल होत नाही. ‘अगा काही घडलेचि नाही’, अशा मानसिकतेत राहतात आणि त्यांचे बंगलेही उजळून निघत असतात. अशा छापासत्रातून त्यांना काहीच फरक पडत नाही.

-योगेश मिश्र,
ज्येष्ठ पत्रकार-विश्लेषक

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR