लातूर : प्रतिनिधी
भारतीय समाजाच्या सामुदायिक शिक्षणाचा पाया महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घातला. शिक्षण घेतलेली पिढी ही स्वावलंबी व स्वाभिमानी होते. सामाजिक क्रांतीसाठी आणि परिवर्तनवादी समाजाच्या निर्मितीसाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी सुशिक्षित आणि विचारशील पिढीची आज गरज आहे, असे असेही प्रतिपादन डॉ. जयद्रथ जाधव यांनी केले.
विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लातूर येथे महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सव अंतर्गत सलग १८ तास अभ्यास या उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमात ४७ विद्यार्थिनी-विद्यार्थी सहभागी झाले. उपक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे म्हणाले की, सुसंस्कुत समाज घडविणेकरिता आध्यात्मिक, भौतिक, सामाजिक व सांस्कृतिक शिक्षण आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग सुसंस्कृत नागरिक व सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी करावा.
पत्रकार डॉ. विनोद चव्हाण यांनी सलग १८ तास अभ्यास उपक्रमाचे कौतुक केले. डॉ. व्यंकट जगताप यांनी उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास वाढणेकरिता उपयोग होईल असे मत व्यक्त केले. डॉ. भास्कर आगलावे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. योगेश भगत यांनी सूत्रसंचालन तर डॉ. अच्युत भरोसे यांनी आभार मानले.
याप्रसंगी डॉ. सारिका भालेराव, डॉ. रमेश ढवळे, डॉ. विद्या हिंगे, डॉ. दीप्ती वानखडे, विद्यार्थिनी-विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
………………………….१३……………………..