16.5 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeपरभणीसमाज माध्यमांवर काय पहावे याचे ज्ञान असणे आवश्यक : पोलिस अधीक्षक परदेशी

समाज माध्यमांवर काय पहावे याचे ज्ञान असणे आवश्यक : पोलिस अधीक्षक परदेशी

मानवत/प्रतिनिधी
युवकांना हव्या असणा-या प्रेरणा समाज माध्यमांवर उपलब्ध आहेत. फक्त समाज माध्यमावर काय पहावे याचे ज्ञान हवे असे मत पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी व्यक्त केले.

तालुका पत्रकार संघ गणेश मंडळातर्फे येथील केकेएम महाविद्यालयाच्या स्व. पन्नालाल चांडक सभागृहात समाज माध्यमांचा वापर आणि आजची तरुणाई या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बालकिशन चांडक होते. यावेळी कोषाध्यक्ष रामचंद्रराव कत्रुवार, प्राचार्य भास्कर मुंडे, नगर पालिकेच्या मुख्याधिकारी कोमल सावरे, पोलीस उपनिरीक्षक संदीप बोरकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय नाईक यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना श्री. परदेशी म्हणाले की, समाज माध्यमांचा वापर करताना आपण सावध असायला हवे. समाज माध्यमांचा रियल टाईममध्ये निश्चितच फायदा होतो. परंतु त्याबरोबरच फसवाफसवीही होते. त्यामुळे कोणत्याही अनोळखी नंबर वरून आलेली लिंक ओपन करू नका असे त्यांनी आवर्जून सांगितले. पुस्तके आणि वर्तमानपत्रे वाचल्याने विद्यार्थ्यांचे अनुभव विश्व समृद्ध होते. प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. कोणतेही क्षेत्र कमी नाही मात्र त्या क्षेत्रात आपण नेटाने आणि अभ्यासपूर्ण काम करायला पाहिजे. आपल्याला लागणा-या प्रेरणा आपल्या आजूबाजूला घडत असतात. त्याच समाज माध्यमांवरही आपल्याला ठळकपणे दिसून येतात.

त्याकडे पाहण्याची आपली नजर असली पाहिजे असे सांगत २०२२च्या एशियन गेममध्ये शितलदेवी या हात नसलेल्या मुलीने तिरंदाजी स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवल्याचे सांगितले. चंद्रपूर जिल्ह्यातील डोंगरहळदी या लहान गावाच्या सोहम उईके नावाच्या मुलाचा व्हिडिओ दाखवून त्या मुलाची विचार करण्याची पद्धती कशी वेगळी आहे हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्याचबरोबर व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण, आर के नारायण यांची पुस्तके, मीना प्रभू यांची प्रवास वर्णने वाचून आपले अनुभव विश्व समृद्ध केले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

मुलींच्या संरक्षणासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचेही श्री.परदेशी यांनी सांगितले. मुलींना कोणतीही अडचण आल्यास शकुंतला चांदीवाले यांचा मोबाईल क्रमांकही देण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य भास्कर मुंडे, संचालन प्रा. डॉ. दुर्गेश रवंदे तर मनोगत व आभार प्रसाद जोशी यांनी केले. या कार्यक्रमास अ‍ॅड. सतीश बारहाते यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी कर्मचारी व पत्रकार संघाचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR