नागपूर : गुरुवारी सकाळी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात झाला. यामध्ये गाडीतील २ जण जागीच ठार, तर ३ जण गंभीर जखमी झाले. दरम्यान चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. महामार्गावरील साईड बॅरियरला तोडून गाडी उलटली आणि त्यामुळे भीषण अपघात झाला.
समृद्धी महामार्गावर सिन्नरजवळ स्कॉर्पिओचा अपघात झाला. ही स्कॉर्पिओ गाडी छत्रपती संभाजीनगरहून नाशिककडे येत होती. त्यामधील सर्व प्रवासी छत्रपती संभाजीनगरच्या करवड गावचे रहिवासी होते.
गेल्या अनेक महिन्यांपासून या महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत, ज्यामध्ये अनेकांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे.
अपघातानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दिलेल्या महितीनुसार, बाजीराव एकनाथ गांगुर्डे यांचा जागीच मृत्यू झाला. तर निशा रामकिसन गडगूळ (वय-२०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये वाहनचालक परमेश्वर पुंडलिक गडगूळ, मीनाबाई रामकिसन गडगूळ, रामकिसन गडगूळ जखमी झाले आहेत.
अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करत अपघातग्रस्त वाहन देखील रस्त्यातून बाजूला केले आणि वाहतूक सुरळीत केली.