छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
समृद्धी महामार्गावरील हड्स पिंपळगाव शिवारात बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास अपघाताची घटना घडली. रुग्णवाहिकेची अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक बसून दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत ५ जण जखमी झाल्याचे समोर आले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, समीर मोहम्मद या रुग्णाला घेऊन त्यांचे नातेवाईक रुग्णवाहिका क्रमांक एमएच १५ ईएफ ००८९ ने नाशिक येथून पटणा येथील एम्स रुग्णालयाकडे जात होते.
बिहारकडे जात असताना ५ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास हडस पिंपळगाव शिवारात अज्ञात वाहनाशी रुग्णवाहिका पाठीमागून धडकली. या अपघातात समीर मोहम्मद (वय ५७ वर्षे, रा. बिहार) व अमीना खातून (वय ५२ वर्षे, रा. बिहार) अशी अपघातातील मयतांची नावे आहेत.
अपघाताच्या घटनेनंतर अपघातातील जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.
दरम्यान, अपघातामध्ये रुग्णवाहिकेचेही मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. रुग्णवाहिकेला क्रेनच्या सहाय्याने रस्त्यावरून हटविण्यात आले आहे.