22 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्र सरकारची लाडका मित्र योजना

 सरकारची लाडका मित्र योजना

मुंबईला अदानी सिटी करण्याचा डाव : उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका

मुंबई : प्रतिनिधी
धारावीचा भूखंड अदानीच्या घशात घालून मुंबईला अदानी सिटी करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा डाव आहे. सरकारची लाडका मित्र, लाडका काँट्रॅक्टर किंवा लाडका उद्योगपती योजना सुरू आहे, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ते शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्यावरून महायुती सरकारला लक्ष्य केले.

दरम्यान, निवडणुका जवळ आल्या आहेत आणि निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हे सरकार फसव्या घोषणांचा पाऊस पाडायला लागले आहे. त्यांना असे वाटते की, त्यांनी आतापर्यंत जो काही कारभार केला तो सगळा कारभार जनता विसरेल आणि फसव्या योजनांना बळी पडून यांना मतदान करेल. मग या योजनांमध्ये ‘लाडकी बहीण’ अशा ब-याच काही गोष्टी आहेत. बाकीच्या योजनांबाबत मी आज काही बोलणार नाही त्याच्याबद्दल जनता बोलते, जनता अनुभव घेते आहे. आज मी त्यांच्या एका योजनेबद्दल बोलणार आहे आणि ती योजना म्हणजे ‘लाडका मित्र’, ‘लाडका कॉन्ट्रॅक्टर’ किंवा ‘लाडका उद्योगपती योजना’. त्या योजनेबद्दल आम्ही गेल्या वर्षी धारावी येथे मोठा मोर्चा काढला होता, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

धारावीवासियांना हक्काचे घर मिळालेच पाहिजे
धारावीच्या पुनर्वसन प्रकल्पाबद्दल धारावीकरांना त्यांच्या हक्काचे घर तिथल्या तिथे मिळालेच पाहिजे आणि ते सुद्धा ५०० स्क्वेअर फुटाचे मिळालेच पाहिजे ही शिवसेनेची आधीही भूमिका होती, हीच भूमिका आजही आहे आणि उद्याही राहील, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. धारावी ही केवळ एक नुसती झोपडपट्टी नाही तर त्याच्यात वेगळेपण आहे. ते वेगळेपण म्हणजे या प्रत्येक घरामध्ये एक मायक्रोस्केल उद्योग चालतो. मग त्याच्यामध्ये काही ठिकाणी कुंभार पण आले, अगदी इडलीवाले आले, ब-याच गोष्टी आहेत आणि त्या उद्योगधंद्यांचे काय करणार, याप्रश्नी आम्ही एक मोर्चा काढला होता, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, योजनांच्या सगळ्या फसव्या धोरणामागे सरकार त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राचे चांगभले करू इच्छित आहे. एकूण काय तर मोदी आणि शहा यांनी गुजरातला मुंबईची गिफ्ट सिटी पळवून नेलेली आहे आणि मुंबईला अदानी सिटी करण्याचा त्यांचा डाव आहे म्हणजे कदाचित उद्या हे मुंबईचे नावही बदलतील, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

धारावीकरांना अपात्र ठरवून हाकलण्याचा डाव
अदानींना वारेमाप एफएसआय दिला जातोय. धारावीचा ५९० एकरचा भूखंड आहे, त्यात ३०० एकरवर घरं- गृहनिर्माण विभाग आहे. बाकी माहीम नेचर पार्क, टाटा पॉवर स्टेशन आहे. अदानीला दिलेल्या टेंडरमध्ये वाढीव एफएसआयचा उल्लेख नाही. आता तिथे सर्व घरांना नंबर देत आहेत, म्हणजे पात्र-अपात्रतेच्या निकषात अडकवून घरं रिकामी करायची, धारावीकरांना हाकलून लावायचं, धारावी रिकामी झाली की ती अदानीच्या घशात घालून भूखंडाचं श्रीखंड ओरपायचं, नागरी संतुलन बिघडवण्याचं काम सुरू आहे असे उद्धव ठाकरे यांनी केली.

भगवा सप्ताहाचे आयोजन
शिवसेना ठाकरे गटाकडून ४ ऑगस्ट ते ११ ऑगस्टपर्यंत भगवा सप्ताहाचे आयोजन करण्याचेही विधानसभा संपर्कप्रमुखांना सांगण्यात आलं आहे. या भगवा सप्ताहमध्ये विधानसभा क्षेत्राचा आढावा घेऊन त्याची माहिती सेनाभवन येथे सादर करायची आहे. त्यामध्ये विविध कार्यक्रम आढावा बैठका घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR