24.4 C
Latur
Sunday, September 22, 2024
Homeमहाराष्ट्रसरकारच्या निषेधार्थ महिला संतप्त, लाडकी बहीण योजनेचे पैसे केले परत

सरकारच्या निषेधार्थ महिला संतप्त, लाडकी बहीण योजनेचे पैसे केले परत

भाईंदर: कोलकात्यामधील डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आली, त्यानंतर १० दिवसांनी बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर शाळेमध्ये लैंगिक अत्याचार झाला. त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रामधून नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या निषेधार्थ भाईंदरमधील महिलांनी तहसीलदार कार्यालयात जाऊन लाडकी बहीण योजनेचे पैसे परत केले. ‘आम्हाला पैसे नको तर सुरक्षा हवी’ असे या महिलांनी शासनाला ठणकावले आहे, या महिलांची कृती चर्चेचा विषय बनली आहे.

बदलापूर येथे अल्पवयीन मुलींवर शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचाराचे तीव्र पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप पसरला असून शासनाविरोधात रोष दिसून येत आहे. ठिकठिकाणी सामाजिक संस्थांसह राजकीय पक्षाकडून आंदोलन करून निषेध नोंदवला जात आहे. बुधवारी मीरा भाईंदरमध्ये शासनाचा अनोख्या पध्दतीने निषेध करण्यात आला. काही महिलांनी भाईंदर पश्चिम येथील अप्पर तहसीलदार कार्यालयात जाऊन लाडकी बहीण योजनेतून मिळालेले पैसे परत केले.

याबाबतची चित्रफीत तयार करून त्यांनी ही माहिती दिली. आम्हाला अशा पैशांची गरज नाही. शासनाने आम्हाला केवळ सुरक्षा द्यावी असे त्यांनी सांगितले. एकीकडे सरकार मुलींना सुरक्षा देऊ शकत नाही आणि दुसरीकडे लाडकी बहीण योजना देऊन भुलवले जात असल्याचा आरोप या महिलांनी केला. या महिलांच्या कृतीचे समाज माध्यमावर कौतुक होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR