21.3 C
Latur
Thursday, December 26, 2024
Homeमहाराष्ट्रसरकार लाडक्या बहिणींच्या नव-यांना दारुडे बनवणार

सरकार लाडक्या बहिणींच्या नव-यांना दारुडे बनवणार

मुंबई : लाडक्या बहि­णींना १५०० रुपये देण्यासाठी लाडक्या बहि­णींच्या भावांना आणि नव-याला हे सरकार दारुडे करणार आहे. १५०० रुपयांसाठी संपूर्ण महाराष्ट्र दारुडा करण्याची योजना असेल तर हे अत्यंत गंभीर आहे, असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.

खासदार राऊत यांनी बुधवारी (ता. २५ डिसेंबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना लाडकी बहीण सारख्या योजनांमुळे सरकारी तिजोरी मोकळी झाली असून महसुली तूट वाढली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांच्या बैठकीमध्ये दारूच्या दुकानांचे परवाने वाढवण्यावर चर्चा झाली, याबाबतची विचारणा करण्यात आली. तेव्हा राऊतांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.
प्रसार माध्यमांसमोर खासदार संजय राऊत म्हणाले की, लाडक्या बहि­णींना दीड हजार रुपये देण्यासाठी लाडक्या बहि­णींच्या भावांना, नव-यांना हे सरकार दारुडे करणार आहे. १५०० रुपयांसाठी संपूर्ण महाराष्ट्र दारुडा करण्याची योजना असेल तर हे अत्यंत गंभीर आहे. दारूची दुकाने वाढवणार, ड्राय डे कमी करणार, त्यानंतर शॉप आणि मॉलमधून दारू विक्री करण्याचेही प्रपोजल आलेले आहे. काही राज्यांत घरपोच दारूही मिळते. काहीही करून लाडक्या बहि­णींना १५०० रुपये देण्यासाठी घराघरांत दारू पोहोचवा असे सरकारचे नवीन व्हिजन दिसत आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.

तसेच, लाडक्या बहि­णींना १५०० रुपये द्यायचे आणि त्या बदल्यात बहि­णींच्या घरात बेवडे, दारुडे निर्माण करायचे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावणारा हा प्रकार आहे. महसूल वाढवण्यासाठी अजित पवार यांच्यासारखा नेता हा विचार करत असेल तर हे राज्याचे दुर्दैवच म्हणायला हवे. हा त्यांचा विचार असेल तर त्यांनी त्यांच्या होर्डिंग्जवर किंवा कार्यक्रमात शाहू, फुले, आंबेडकर यांचे फोटो लावणे बंद केले पाहिजे, अशी जहरी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

भविष्यात योजना बंद होईल
दरम्यान, लाडकी बहीण योजनेचे निकष आणखी कठोर करण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्या आहेत. भविष्यात सरकार अशी योजना बंदही करू शकते. लाखो, हजारो कोटींचे ओझे घेऊन आणि भ्रष्टाचाराची लुटमार सुरू ठेवून हे राज्य चालवणे सोपे नाही. निवडणुकीच्या आधी मतांसाठी कोणतेही निकष न लावता पैसे वाटले आणि निवडणुका जिंकल्यावर निकष लावण्यात येत आहेत. त्यात दारू दुकानांचे परवाने वाढवणे हा गंभीर मुद्दा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR