नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची सुरक्षा वाढवण्यात आली असून त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन भागवत यांची सुरक्षा झेड प्लसवरून वाढवून अॅडव्हान्स सिक्योरिटी लायजन करण्यात आली आहे. जी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना आहे.
मोहन भागवत यांची सुरक्षा वाढवून, पीएम मोदी आणि अमित शाह यांच्या दर्जाची सुरक्षा दिल्यानंतर, अखेर त्यांना कुणापासून धोका आहे? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुरक्षेची समीक्षा केल्यानंतर, पंधरवड्यापूर्वीच सुरक्षा वाढविण्याला अंतिम रूप देण्यात आले. मोहन भागवत बिगर-भाजप शासित राज्यांच्या दौ-यावर असताना त्यांच्या सुरक्षेत ढिलाई आढळून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
सरसंघचालक मोहन भागवत यांच्या झेड प्लस सुरक्षेत सीआयएसएफमधून डेप्युटेशनवर आलेल्या अधिकारी आणि सुरक्षारक्षकांचा समावेश होता. ही सुरक्षा अपग्रेड करून अॅडव्हान्सड सिक्योरिटी लायजन करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरसंघचालक कट्टर इस्लामिक संघटनांसह अनेक संघटनांच्या निशाण्यावर आहेत.