21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रसरोज अहिरे याच महायुतीच्या उमेदवार

सरोज अहिरे याच महायुतीच्या उमेदवार

देवळाली : शेवटच्या क्षणी करामती करून देवळाली मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी राजश्री अहिरराव यांनी मिळवली होती. आता ते त्यांच्या अंगलट आले आहे. शिवसेना शिंदे पक्षाने त्यांना प्रचार शेवटच्या टप्प्यात असताना अक्षरश: वा-यावर सोडले आहे.

देवळाली मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या विद्यमान आमदार सरोज अहिरे या उमेदवार आहेत. त्या महायुतीच्या उमेदवार म्हणून मतदारांना सामो-या जात आहेत. मात्र येथे महायुतीच्या उमेदवार म्हणून राजश्री अहिरराव देखील प्रचार करीत होत्या. त्यामुळे महायुतीच्या ख-या उमेदवार कोण? असा संभ्रम होता.

या मतदारसंघात स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना एकनाथ शिंदे गटाची उमेदवारी त्यांना देण्यात आली होती. या संदर्भात उपमुख्यमंत्री पवार यांनी हस्तक्षेप केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी धनराज महाले (दिंडोरी) आणि राजश्री अहिरराव (देवळाली) यांना उमेदवारी मागे घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
मात्र श्रीमती अहिरराव यांनी माघार घेतली नव्हती. शिवसेनेच्या काही पदाधिका-यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. आता निवडणुकीचा प्रचार दोन दिवस शिल्लक आहे. असे असताना काल रात्री शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी एक पत्र व्हायरल केले आहे. यामध्ये राजश्री अहिरराव यांना माघार घेण्याची सूचना केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या आमदार सरोज अहिरे याच महायुतीच्या अधिकृत उमेदवार आहेत. महायुतीमध्ये कोणताही विसंवाद असू नये तसेच या विसंवादाचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसू नये म्हणून अहिरराव यांना शिवसेनेच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी सहकार्य करू नये, असे पत्रात म्हटले आहे.

हा निर्णय झाल्याने उमेदवार राजश्री अहिरराव यांना मोठा झटका बसला आहे. निवडणुकीत पक्षाने त्यांना वा-यावर सोडल्याचे चित्र आहे. त्यांनी कालपर्यंत प्रचार केला आहे. त्यात शिंदे पक्षाचे काही पदाधिकारी देखील सहभागी होते. आता त्यांना पाठिंबा नसल्याने त्यांच्यापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व घडामोडींचा मोठा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अहिरे यांना मिळणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR