पुणे : प्रतिनिधी
देशातील साखर उद्योग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्वतंत्र बहुराज्यीय सहकारी सोसायटी उभारण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितली. राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाने वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेत विविध राज्यांतील साखर कारखानदार यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, देशातील ३०० सहकारी साखर कारखान्यांमधून ५० लाख शेतक-यांच्या शेतीमधील उसाचे गाळप होते. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेले साखर कारखाने आर्थिक, तांत्रिकआणि पर्यावरणविषयक अडचणी यास सामोरे जात आहेत. त्यांना सक्षम करण्यासाठी बहुराज्यीय सोसायटी स्थापन करण्यात आली आहे. यामधून साखर कारखान्यांच्या चक्रिय अर्थव्यवस्थेला बळकटी मिळून ऊस शेतीला आधार मिळणार आहे.
सहकार हा राज्याचा विषय असला तरी शेतकरी वर्ग व ग्रामीण अर्थव्यवस्थेला मदतीच्या हेतूने केंद्राने सहकार मंत्रालय स्थापन केले. या मंत्रालयाने आजवर सहकार क्षेत्राच्या हिताचे १३३ निर्णय घेतले. ७० हजार विविध कार्यकारी सोसायटी संगणकीकरणाची प्रक्रिया सुरू केली. आगामी काळात सहकार क्षेत्राला मनुष्यबळाची गरज भासेल त्यासाठी गुजरातमध्ये स्वतंत्र सहकार विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे
सहकार क्षेत्रात साखर कारखान्यांची भूमिका महत्त्वाची असून त्यासाठी बहुराज्यीय सोसायटी स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला, असे ते म्हणाले. यावेळी सहकार मंत्रालयाचे संयुक्त सचिव रमण कुमार, गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचे पदाधिकारी आणि कार्यकारी संचालक उपस्थित होते.
















