सांगली : प्रतिनिधी
दिवाळी फराळासोबत पैसे वाटत असताना दोघांना पकडून १ लाख ३ हजार ५०० रुपये जप्त करण्यात आले. त्यांच्याविरुध्द आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार रोहित पाटील यांना मतदान व्हावे यासाठी हे पैशाचे वाटप सुरू होते, असा आरोप माजी खासदार व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी केला आहे.
उमेदवार रोहित पाटील यांची प्रचारफेरी साठेनगर परिसरात होती. या दरम्यान, काही कार्यकर्त्यांकडून दिवाळी फराळासोबत पैशाचे वाटप होत असल्याची तक्रार येताच माजी खासदार पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून ध्वनिचित्रफितीवर कबुली घेण्यात आली. या याप्रकरणी पोलिस ठाण्यात व निवडणूक निरीक्षकांकडे तक्रार करून दोघांना ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी निवडणूक निरीक्षक शिवप्रसाद भिसे यांनी तासगाव पोलिस ठाण्यात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली असून या तक्रारीनुसार सचिन ऊर्फ बाबजी गणपतराव पाटील व बाबासाहेब ऊर्फ खंडू निवृत्ती कदम या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी दिवाळी फराळासोबत पैशाची पाकिटे वाटण्यात येत होती. या पाकिटात पाचशे रुपयांच्या सहा असे तीन हजार रुपये होते. तसेच काही रक्कम खिशात होती. या दोघांकडून १ लाख ३ हजार ५०० रुपये आणि एक भ्रमणध्वनी जप्त करण्यात आला आहे.