24 C
Latur
Thursday, September 19, 2024
HomeUncategorizedसांगोला वन विभागाची कारवाईची धडक मोहीम

सांगोला वन विभागाची कारवाईची धडक मोहीम

सांगोला-
सांगोला वन विभागाचे कार्यक्षेत्र सांगोला, जुनोनी, कोळा या विभागांत विखुरले आहे. या विभागांतील वन परिक्षेत्र परिसरात पशुपक्षी व प्राण्यांसाठी ४८ पाण्याचे पाणवठे आहेत. या पाणवठ्यांमध्ये टँकरने पाणी सोडून पशुपक्षी, प्राण्यांसाठी पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून दिले जात आहे. वृक्ष जगण्यास प्राधान्य दिले जात आहे. मात्र, विनापरवाना वृक्षतोड करण्यात येत असल्याने ही वृक्षतोड रोखण्याचे आव्हान वन विभागासमोर आहे. वन विभागाने कारवाई करत एकूण आठ लाख ६० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.

अचकदाणी येथे शासकीय वन विभागाची रोपवाटिका असून याठिकाणी आज एक लाख ३० हजार रोपे तयार आहेत. वन विभागाने वन क्षेत्रातील घेरडी गावच्या वन विभागातील शेतकऱ्याने अतिक्रमण केलेली ५२ गुंठे जमीन ताब्यात घेऊन संबंधित व्यक्तीवर गुन्हा नोंद केला आहे.

वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांचे व पशुधनाचे झालेले नुकसान यासाठी चार लाख ७१ हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात आली आहे. वन्यप्राण्यांकडून शेती पिकाचे नुकसान भरपाईपोटी ७२ हजार ४५० रुपये शेतक-यांना देण्यात आले आहेत. वन्यप्राण्यांपासून जखमी झालेल्या व्यक्तींना ४६ हजार ७१९ रुपये नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे. वन परिक्षेत्रातील संयुक्त वनव्यवस्थापन गावामध्ये एलपीजी गॅसची रकम लाभार्थ्यांनी न घेतल्यामुळे ग्रामसभेचा ठराव व संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा ठराव घेऊन एलपीजी गॅसऐवजी त्यांना स्मार्ट टीव्ही, एलईडी, बीटी स्पीकर, कलर प्रिंटर, पाणी फिल्टर, इन्व्हर्टर, प्लास्टिक पाणी टाकी, कॉम्प्युटर प्रिंटर, प्रोजेक्ट स्कीम साऊंड सिस्टीम, १०० किलोचा वजन काटा पाच नग,प्रिंटर १८ नग, कॉपर केबल हे साहित्य देण्यात आले.

महुद बुद्रुक येथील शाळा, चिकमहृद, धायटी, हलदहिवडी, शिरभावी, हंगिरगे, वाणी चिंचाळे, वुजारपूर, कोळा या गावांत एकूण १२ लाख रुपये किमतीचे साहित्य वाटप केले आहे. आचकदाणी वन परिक्षेत्रात सन २०२३ मध्ये वृक्ष लागवड करण्यात आली असून २० हेक्टरवरती २२ हजार २२० हजार विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे.

आज तेथे ८५ टके झाडे जिवंत आहेत. कटफळ भागामध्ये ११ हजार ११० इतकी वृक्ष लागवड करण्यात आली. त्यापैकी ८५ टक्के रोपे जिवंत आहेत. गेल्या पाच वर्षांत लागवड केलेली सुमारे ७० टक्के झाडे जिवंत आहेत. विनापरवाना वृक्षतोड, लाकूड वाहतूक करणे कायद्याने गुन्हा आहे. तीन जुलै २०२३ ते २५ मार्च २०२४ या नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये गुन्हे कामातील अवैध कारवाई केली आहे. दरम्यान, पेरडी परिसरात विनापरवाना कडूलिंबाच्या व बाभळीच्या झाडाची तोड करून ट्रक भरून चाललेला असताना वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रात्री अकरा वाजता पकडला आहे. सांगोला येथे एक ट्रॅक्टर लिंबाच्या झाडाची लाकडे भरून चालला असता पकडण्यात आला.

ही दोन्ही वाहने, दंडात्मक कारवाईसाठी वन परिक्षेत्र कार्यालय सांगोला येथे जप्त करून आणण्यात आली आहेत. या जप्त केलेल्या वाहनांचा तपास करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई सोलापूर उपवन संरक्षक अधिकारी धैर्यशील पाटील व सहायक वनसरक्षक बी. जी. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्राधिकारी तुकाराम जाधवर यांनी केली आहे.अवैध वृक्षतोड, अवैध वाहतूक, कोळसा लिलाव यावर कारवाई करीत एकूण आठ लाख ६० हजार रुपयांची आर्थिक दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. जमा झालेली रक्कम शासकीय भरणा केली आहे. अत्यंत महत्त्वाची गरज व अडचण असल्यास वन परिक्षेत्र अधिकारी वन विभाग सांगोला यांची परवानगी घेऊनच वृक्षतोड करावी.असे वन परिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR