18.2 C
Latur
Sunday, January 12, 2025
Homeमहाराष्ट्रसाता-याच्या जागेवरून महायुतीत बेबनाव!

साता-याच्या जागेवरून महायुतीत बेबनाव!

मुंबई : प्रतिनिधी
सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी, भाजपमध्ये पारंपरिक लढत होत असे. मात्र, महायुतीत दोनवेळा शिवसेनेला ही जागा सोडण्यात आली होती. मात्र, यंदा तीन पक्षांची महायुती झाल्याने राजकीय समीकरणे बदलली असून, सर्वप्रथम अजित पवार गटाने साता-याच्या जागेवर दावा केला. मात्र, त्यावेळी कुणीही जाहीर प्रतिक्रिया दिली नव्हती. परंतु महायुतीत धुसफूस असल्याची चर्चा होती. त्यातच आज भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी साता-याची जागा भाजपचीच असून, कुणी कितीही दावा केला, तरी ही जागा भाजप सोडणार नाही, असे सांगत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते पुरुषोत्तम जाधव तर आधीपासूनच लोकसभेच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे या जागेवरून महायुतीत बेबनाव पाहायला मिळणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे नुकते कर्जत येथे शिबिर झाले. या शिबिरात बोलताना अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार असलेल्या चार जागांवर जाहीरपणे दावा केला होता. त्यावेळी भाजप नेत्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, आता भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपचाच असून आम्हीच याठिकाणी निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.

आ. जयकुमार गोरे यांच्या आक्रमक दाव्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत वादाची ठिणगी पडू शकते. सध्या सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे श्रीनिवास पाटील खासदार आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवारांनीदेखील या मतदारसंघावर दावा ठोकला आहे. मात्र, भाजप ही जागा सोडण्यास तयार होईल, असे वाटत नाही. कारण आ. जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्ह्यात भाजपने चार वर्षांत चांगली बांधणी केली आहे. त्यातच भाजप हा सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे कोणी काहीही भूमिका मांडली तरीही कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ भाजपकडेच राहिला पाहिजे, असे मत पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केले आहे. त्यामुळे हा मतदारसंघ आम्ही कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असे जयकुमार गोरे म्हणाले.

अजित पवारांनी केला होता दावा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत आपला पक्ष बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवेल, असे जाहीर केले होते. पक्षाच्या कर्जतधील दोन दिवसीय शिबिरात त्यांनी ही घोषणा केली होती. राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार जिथून निवडून आले, त्या ठिकाणी अजित पवार गट निवडणूक लढवेल, असे त्यांनी म्हटले होते.

शिंदे गटालाही हवी जागा
दरम्यान, सातारा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मूळ जिल्हा आहे. त्यात या जिल्ह्यात शिंदे गटाचीही ताकद मोठी आहे. त्यामुळे शिंदे गटाचे नेते पुरुषोत्तम जाधव यांनीही लोकसभा निवडणुकीची तयारी केली आहे. कोणत्याही परिस्थितीत आपण लोकसभा निवडणूक लढणारच, असा त्यांचा ठाम निर्धार आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांत येथील जागेवरून वाद रंगण्याची शक्यता आहे.

 

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR