26.2 C
Latur
Friday, December 6, 2024
Homeलातूरसामाजिक एकोपा ही लातूरची खरी ओळख

सामाजिक एकोपा ही लातूरची खरी ओळख

लातूर : प्रतिनिधी
शांतता, सुरक्षितता व सामाजिक एकोपा ही लातूरची खरी ओळख आहे, ती जपण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न केला आहे. यामुळेच लातूर विकासाच्या महामार्गावर गतिमान पध्दतीने पुढे जात आहे. जातीय आणि धार्मिक द्वेष पसरविणा-यांना येथे थारा दिली जात नाही. राज्यातही असेच वातावरण राहावे म्हणून जाती-धर्मात भांडणे लावणारे तसेच महापुरुषांबद्दल अनुद्गार काढून समाजात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करणा-यांविरोधात कठोर कारवाई करण्यासंदर्भात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास आम्ही कायदा करणार असल्याचे माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी बुधवारी सांयकाळी लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ७, ८, ९ च्या संयुक्त स्नेह मेळाव्यात बोलताना सांगीतले.
या वेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे, माजी खासदार सुधाकर शृंगारे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस मोईज शेख, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगराध्यक्ष सुनील बसपुरे, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, माजी सभापती अशोक गोविंदपूरकर, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, माजी नगरसेवक सपना किसवे, अतिश चिकटे, पृथ्वीराज सिरसाठ, संभाजी सूळ, अ‍ॅड. फारुख शेख आदींसह कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, संकटामध्ये काँग्रेस मदत करते, दुष्काळात मदत करते, कोविड काळात काँग्रेस मदत करते, आपल्या घरासमोरील रस्ता, नालेसफाई, कचरा संबंधित समस्या असली तर काँग्रेस मदत करते आणि आम्हाला तुम्ही विचारता काँग्रेस काय करते? असा थेट सवाल विरोधकांना करत माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूरची जी प्रगती झाली ती काँग्रेसने आखलेल्या धोरणांमुळेच झाल्याचे ठामपणे सांगितले. भाजपने लातूरला फक्त आश्वासने दिले. एकाही आश्वासनाची पूर्तता त्यांना करता आली नाही. या निवडणुकीमध्ये जनतेने भाजपला जाब विचारला पाहिजे की, लातूरसाठी तुम्ही काय केले? महायुती सरकारमध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे. त्याला सामान्य माणसे कंटाळलेली आहेत. महायुती सरकारचा पाया भ्रष्टाचारावर रचलेला आहे. महागाई, विजेचे दर महायुती सरकारने वाढवलेले आहेत. करामध्ये भरमसाठ वाढ केलेली आहे. कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे. नुसत्या घोषणा करायच्या, अंमलबजावणी करायची नाही, असे रोखठोक मत आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केले.
सर्वधर्म समभाव जोपासण्याचे काम महाविकास आघाडीने केले
अल्पसंख्याक समाजाच्या १३ नेत्यांना महाराष्ट्र विधानसभेमध्ये उमेदवारी देण्याचे काम महाविकास आघाडीने केले आहे. सर्वधर्मसमभाव जोपासण्याचे काम महाविकास आघाडीने केले आहे. महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी आपण एकत्रित आलो आहोत. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर लातूरचे स्थान महाविकास आघाडी सरकारमध्ये बलवान राहील. २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे ईव्हीएम मशीनवर क्रमांक एकचे नाव अमित विलासराव देशमुख आहे. नावासमोरील हाताच्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण मला बहुमताने निवडून द्यावे, माझ्या पाठीशी आशीर्वाद उभे करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
लातूरमध्ये आपण गुण्यागोविंदाने नांदतो, नोकरी करतो, व्यवसाय करतो. गेल्या ५० वर्षांमध्ये एकाही लातूरकरांच्या केसाला धक्का लागू दिला नाही, म्हणून आपल्याला महाविकास आघाडीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहायचे आहे. महायुती सरकारमधील मुख्यमंत्री यांच्याबद्दल कोणी बोलले, कोणत्या मंत्र्यांबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केली तरी त्याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली जाते. पण कोणत्याही धर्माच्याविरोधात कोणी असे बोलले तर त्यांना मोकळे सोडले जाते. काँग्रेसचे सरकार असते तर कदाचित असे झाले नसते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR