धाराशिव : विशेष प्रतिनिधी
या जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. परंडा आणि उमरगा मतदारसंघातून शिंदे सेनेचे शिलेदार उभे ठाकले आहेत. तुळजापूरात भाजप खिंड लढवणार आहे. तर उरलेल्या उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघासाठी चुरस सुरू आहे. बरं ही चुरस वरवर तीन पक्षात दिसत असली तरी खरी फाईट शिंदे सेना आणि भाजपमध्ये असल्याचा दावा करण्यात येत आहे. एकीकडे तानाजी सावंत तर दुसरीकडे भाजप नेते राणा जगजितसिंह पाटील आग्रही आहेत.
अजित पवार यांची धाराशिव ही सासुरवाडी आहे. त्यामुळे इतर तीन जाऊ द्या, पण निदान उस्मानाबाद विधानसभेसाठी तरी अडून बसायला काय हरकत आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसेच्या दादा गटाला वाटत आहे. ही जागा महायुतीत राष्ट्रवादीला सुटावी अशी गळ कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना घातली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांनी तर त्यासाठी मुंबईत तळ ठोकल्याची चर्चा आहे.
अनेकांच्या भाळी बाशिंग : उस्मानाबाद विधानसभेच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. ही जागा आपल्या पक्षाला सुटावी यासाठी जिल्ह्यातील बडे नेते मुंबईत तळ ठोकून आहेत. त्यांनी वरिष्ठांकडे या जागेसाठी आग्रही भूमिका मांडली आहे. तर दुसरीकडे दादा गटाने जिल्ह्यात विधानसभेला किमान एक तरी जागा असावी अशी आग्रही भूमिका घेतली आहे. भाजपकडून या मतदारसंघासाठी नितीन काळे, सरोजिनी राऊत, अजित पिंगळे, शिंदे गटाकडून नितीन लांडगे, सुरज सोळंके, सुधीर पाटील, शिवाजी कापसे तर तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत पण इच्छुक आहेत.
कार्यकर्त्यांची कशी समजूत काढणार?
लोकसभेत धाराशिव जिल्ह्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आस्मान दाखवले होते. अजितदादांनी या ठिकाणी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उभे केले होते. त्यासाठी धडाक्यात प्रचार आणि सभा ही झाल्या. पण निकालात दादा गटाचं पानीपत झालं. त्यामुळे विधानसभेला धाराशिवची जागा नकोच असे काहीसे समीकरण असल्याची चर्चा आहे.