ओमदुरमन : वृत्तसंस्था
गृहयुद्धाच्या आगीत होरपळणा-या सुदान देशातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील ओमदुरमन शहरात लष्कराचे विमान कोसळले, ज्यात ४६ जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी आहेत. लष्कर आणि आरोग्य अधिका-यांनी बुधवारी (२६ फेब्रुवारी) या घटनेची माहिती दिली. या अपघातात अनेक लष्करी जवान आणि नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
सुदानच्या लष्कराच्या अहवालानुसार, लष्कराचे अँटोनोव्ह विमान मंगळवारी (२४ फेब्रुवारी) वाडी सय्यदना एअरबेसवरून उड्डाण घेत असताना क्रॅश झाले.
सुदान २०२३ पासून गृहयुद्धाच्या गर्तेत आहे. येथे लष्कर आणि कुख्यात निमलष्करी गट रॅपिड सपोर्ट फोर्सेस (आरएसएफ) यांच्यातील तणावामुळे युद्ध पेटले आहे. हा संघर्ष शहरी भागात, विशेषत: दारफुर प्रदेशात विनाशकारी बनला असून, वांशिक हिंसाचार आणि सामूहिक बलात्कार यांसारख्या भयानक घटना घडत आहेत. संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय अधिकार संघटनांनी या घटनांना मानवतेविरोधातील गंभीर गुन्हे आणि युद्ध गुन्हे म्हणून संबोधले आहे.
अलिकडच्या काही महिन्यांत लष्कराने खार्तूम आणि इतर भागात आरएसएफविरुद्ध कारवाई तीव्र केली आहे. अशा घटनांमुळे सुदानचे संकट आणखी गुंतागुंतीचे होत आहे आणि त्यामुळे नागरी सुरक्षा आणि शांततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.