21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयसुप्रीम कोर्टाच्या महत्त्वाच्या निकालाचा सारांश वेबसाईटवर!

सुप्रीम कोर्टाच्या महत्त्वाच्या निकालाचा सारांश वेबसाईटवर!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आपल्या महत्त्वाच्या निकालाचा सारांश देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक नवीन वेब पेज सुरू केली आहे. लँडमार्क जजमेंट समरीज असे या वेब पेजचे नाव आहे. नागरिकांना न्यायिक बाबींची माहिती देणे, विधी जागरुकतेला प्रोत्साहन आणि विधिप्रक्रियेत सजग नागरी सहभाग वाढविणे या उद्देशाने न्यायालयाचे महत्त्वाचे निर्णय नागरिकांना सहज समजावेत, यासाठी हे वेब पेज सुरू केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा देशभरातील विविध क्षेत्रांवर परिणाम होतो. म्हणूनच न्यायालयीन निर्णय नागरिकाभिमुख होणे महत्त्वाचे आहे. मात्र, निकालपत्रातील जटिल कायदेशीर भाषा आणि निकालपत्र दीर्घ असल्याने नागरिकांना संबंधित निकाल समजून घेण्यास अडचणी येतात. तसेच महत्त्वाच्या बाबींसंदर्भात गैरसमजही होऊ शकतो. त्यामुळे सर्व जणांना न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्णय सहजपणे समजून शकतील, या हेतूने नवीन वेब पेजवर निसंदिग्ध, सोप्या भाषेत महत्त्वपूर्ण निर्णयांचे अचूक सारांश प्रसिद्ध केले जातील. या पृष्ठावर सार्वजनिक हितसंबंध असलेल्या महत्त्वपूर्ण निकालांची वर्षनिहाय अद्ययावत यादी देण्यात आली आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

प्रत्येक खटला त्याच्या विषयनिहाय वर्गीकृत केला असून, हा खटला कशाबद्दल आहे, याची एका ओळीत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक वाचकांना हवा असलेला खटल्याचा निकाल त्वरित शोधण्यास मदत होईल. तसेच या पृष्ठांवर संबंधित खटल्याचे उपलब्ध असल्यास चित्रीकरण, संपूर्ण निकाल, युक्तिवादाच्या तपशीलवार नोंदी असल्यास त्याचे थेट दुवे (लिंक) देण्यात आले आहेत.

वाचकांना खटल्याचा निकाल आणि न्यायालयीन युक्तिवाद या दोन्ही गोष्टी समजून घेता येतात, अशा रितीने या निकालांचा सारांश लिहिलेला आहे. नवीन निर्णयाचे सारांश, तसेच महत्त्वाच्या ऐतिहासिक निर्णयाचा समावेश करण्यासाठी हे पृष्ठ सातत्याने अद्ययावत केले जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल अनेकदा समजणे अवघड जाते. विशेषत: युक्तिवादासह माहिती दिल्यानंतर अखेरच्या टप्प्यात मोजक्या शब्दांत निकाल दिला जातो. तो अनेकदा सहजासहजी समजायला जड जातो. त्यामुळे यातून अनेकदा गोंधळाची स्थिती निर्माण होते. मात्र, निकाल सहज, सोपा आणि सुटसुटीतपणे कळावा, या उद्देशाने महत्त्वपूर्ण खटल्याच्या निकालाचा वेब पेजवर निकाल देण्याची योजना सुप्रीम कोर्टाने आखली आहे. यातून न्यायालयीन प्रक्रिया अधिक लोकाभिमुख होण्यास मदत होणार आहे.

संशोधन, नियोजन केंद्र
देणार सारांशात माहिती
सर्वोच्च न्यायालयाच्या संशोधन आणि नियोजन केंद्राकडून हे सारांश तयार केले जात आहेत. आपला अमृत महोत्सव साजरा करीत असताना सर्वोच्च न्यायालयाच्या जनसंपर्क वाढीच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. आता महत्त्वपूर्ण निकालाचा सारांश देण्याची व्यवस्था वेब पेजवर करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR