सेलू : अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष, राष्ट्रसंत परमपूज्य स्वामी गोविन्ददेवगिरिजी महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून सेलू येथे १५ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत मराठीतून श्रीराम कथा आयोजन करण्यात आले आहे. या कथेच्या निमित्ताने मंगळवार, दि.१५ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता श्रीकेशवराज बाबासाहेब मंदीर ते श्रीबालाजी मंदीरपर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शहरात आयोजित करण्यात आलेल्या श्रीराम कथा श्रवणाचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन बिहाणी परीवारातर्फे करण्यात आले.
श्रीराम कथेचे मंगळवार, दि.१५ ते बुधवार, दि.२३ ऑक्टोबर या कालावधीत दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत श्रीराम कथा (मराठीतून) होईल. कथास्थळ हनुमानगढ नूतन विद्यालय मागील क्रीडांगण सेलू आहे. कथा श्रवणासाठी इष्टमित्र परिवारासह अगत्यपूर्व उपस्थित राहावे, असे आवाहन जयप्रकाश विजयकुमार बिहाणी आणि बिहाणी परिवारातर्फे करण्यात आले आहे.
श्रीराम कथेच्या यशस्वी आयोजनासाठी तसेच जास्तीत जास्त भाविकांना कथा श्रवणाचा लाभ मिळावा यासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये स्वागत समिती, शोभा यात्रा आणि ग्रंथ दिंडी, पेंडाल आणि स्टेज डिकोरेशन, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्था, भजन संध्या नियोजन, दैनिक स्वछता, कार्यालय समिती, प्रचार आणि प्रसार समिती आणि दैनिक पूजा, उत्सव समितीचा समावेश आहे. सर्वच समित्यांच्या बैठकांमधून नेटके नियोजन व आयोजनावर भर देत देण्यात आलेला आहे. श्रीराम कथेच्या आयोजनामुळे शहरात सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.